कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकर आणि हेक्टरमधला फरक तरी कळतो का, अशी बोचरी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले. ते मंगळवारीसरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये भाजपकडून काढण्यात आलेल्या मोर्चावेळी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफीच्या मागणीवरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, ठाकरे सरकारने कोणताही अभ्यास न करता कर्जमाफी केली आहे. अवघ्या पाच ते सहा हजार रुपयांची मदत ही कर्जमाफी नव्हे. अनेक शेतकऱ्यांना याचा फायदाच झाला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे शेतकरी वर्ग मोर्चाच्या माध्यमातून अस्वस्थता व्यक्त करत आहे. लवकरच हे लोण राज्यभरात पसरेल. उद्धव ठाकरे जोपर्यंत नीट अभ्यास करून शेतकऱ्यांना दिलासा देत नाहीत तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 


कर्जमाफीचे धोरण बदला नाहीतर..... राजू शेट्टींचा सरकारला इशारा


नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार सप्टेंबर २०१९पर्यंत दोन लाखांपर्यंतची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले आहे. मार्च २०२०पासून ही योजना लागू होईल. यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले होते. 


कर्जमाफी : कोणाचा अर्ज नको, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही- जयंत पाटील


मात्र, भाजपने या निर्णयावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार होते. पण त्यांनी शब्द फिरवला. केवळ दोन लाखांची कर्जमाफी देऊन या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. या सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसाही दिला नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, आम्ही कर्जमाफीचा योग्य अभ्यास करून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देऊ, असे आश्वासन ठाकरे सरकारने दिले होते.