कर्जमाफी : कोणाचा अर्ज नको, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही - जयंत पाटील

आम्ही थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करणार आहोत. कोणालाही अर्ज भरण्याची गरज नाही, असे जयंत पाटील म्हणालेत. 

Updated: Dec 21, 2019, 06:21 PM IST
कर्जमाफी : कोणाचा अर्ज नको, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही - जयंत पाटील title=

नागपूर : शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकित कर्ज माफ केले जाणार आहे. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलेला नाही. तर शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करताना सभात्याग केला. यावरुन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस आणि भाजपचा चांगला समाचार घेतला. आम्ही थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करणार आहोत. कोणालाही अर्ज भरण्याची गरज नाही. रांगेत पत्नीसोबत उभे राहवे लागणार नाही, असे जयंत पाटील म्हणालेत. जे आधीच्या सरकारला जे जमले नाही ते आम्ही करुन दाखवले आहे. शेतकऱ्यांच्या पीककर्जाबद्दल आम्ही ही भूमिका घेतली आहे, असे ते म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांच्या या आहेत मोठ्या घोषणा

भाजप सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजना राबविताना अनेक अटी आणि नियम घातले होते. तसेच कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले होते. कर्जमाफी अर्ज भरताना संपूर्ण कुटुंबाचे आधार आणि हाताच्या अंगठ्याचे ठसे घेतले जात होते. त्यामुळे शेतकरी यात पुरता पिचला जायचा. कर्ज देण्यासाठी जाचक अटी आता नाही. तर थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे विरोधकांना काहीही बोलता येत नाही. त्यामुळे सुरुवातीपासून विरोधी पक्षनेते उगाच त्रागा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे. विदर्भाच्या नेत्याला काहीही करता आले नाही. मात्र, ठाकरे सरकारने विदर्भाला चांगले देऊ केले आहे. त्यांचे अभिनंदन करतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्यात, जे विदर्भाच्या सुपुत्राला करता आले नाही. या सुपुत्राने सभात्याग केला तर नातवाकडून न्याय देण्यात आला आहे. विरोधक प्रत्येक गोष्टीत खो घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ते बघवत नाही. तसेच शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी झाली आहे. कोणत्याही अटीविना कर्जमाफी करण्यात आली आहे. कोणत्याही अटीविना ही कर्जमाफी करण्यात आली आहे.