पुणे: काँग्रेस पक्षाने शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा डाव आखला आहे. ही पोकळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) भरून काढत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी, असा सावधगिरीचा इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शिवसेनेवर टीका करण्याच्या ओघात चंद्रकांत पाटील यांची जीभ काहीशी घसरली. काँग्रेसने हळूहळू शिवसेनेचा शर्ट काढला, पँटही काढली, असे बोलत पाटील यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सेनेला टोला लगावला. तसेच शिवसेना अजूनही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस करावी, असे आव्हान पाटील यांनी शिवसेनेला दिले. त्यामुळे आता शिवसेना या सगळ्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


आशिष शेलारांविरोधात भाजप कार्यालयाबाहेर वादग्रस्त होर्डींग


तसेच विधानसभा निवडणुकीनंतर कोणी कोणाचा विश्वासघात केला, हे लोकांना माहिती आहे. हे सरकार चालले नाही तर भाजप सरकार पुन्हा सत्तास्थापनेचा दावा करणार नाही. अशावेळी मध्यावधी निवडणूक लागली तर कुणी विश्वासघात केला होता, याचे उत्तर जनताच देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का, या चर्चेला पुन्हा ऊत येण्याची शक्यता आहे. 
 
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण खटल्यावरूनही ठाकरे सरकारचे कान टोचले. मराठा आरक्षणास स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला, याबद्दल त्यांचे आभार मानतो. मात्र, आजच्या सुनावणीवेळी राज्य सरकारने काहीच तयारी केली नव्हती. तेव्हा पुढील काळात राज्य सरकारने पूर्ण ताकदीने हा खटला लढवावा. यामध्ये राजकारण आणू नये. गरज पडल्यास विरोधी पक्षाची मदत घ्यावी, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.