पुणे: लॉकडाऊनमुळे यंदा श्रावण महिन्यापूर्वी सामिष भोजनाचा शेवटचा आस्वाद घेण्याची पुणेकरांची संधी हुकण्याची शक्यता होती. मात्र, प्रशासनाने ही अडचण लक्षात घेऊन १९ तारखेला गटारी अमवस्येनिमित्त मटण शॉप आणि किराणा दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मांसाहारप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. केवळ उद्यापुरतीच ही सूट असेल, असे पुण्याचे नवनिर्वाचित आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही', अजितदादांची तंबी


१४ जुलैपासून पुण्यात कठोर लॉकडाउनची अंमलबजावणी सुरु आहे. जीवनावश्यक वस्तू, मटन, चिकन, मासे, अंडी विक्रीची सर्व दुकाने बंद होती. मात्र, आता गटारीसाठी जीवनावश्यक वस्तुंची, किरकोळ, मटन, चिकन, मासे, अंडी विक्रीची सर्व दुकाने सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत चालू राहणार आहेत. 

दरम्यान, पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनमुळे उद्या मटण आणि चिकनच्या दुकानांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने ही दुकाने दिवसभर सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षित अंतर राखून नियमांचे पालन करुन नागरिकांनी खरेदी करावी असे आदेशामध्ये म्हटले आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही उद्यापुरता लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. 


सध्या पुण्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. एक्टिव्ह रुग्णसंख्येच्याबाबतीत पुण्याने मुंबईला मागे टाकले आहे. त्यामुळे पुण्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. परंतु, येत्या २१ जुलैपासून श्रावण महिना सुरु होत आहे. २० जुलैला सोमवती आमावस्या आहे. त्यामुळे १९ जुलैला रविवार येत असून आषाढ आमवस्येला मटन विक्री मोठ्या प्रमाणात होते. परंतु, यंदा लॉकडाऊनमुळे पुणेकरांची गटारी हुकण्याची शक्यता होती. मात्र, पुणे मटन दुकानदार असोसिएशन आणि अखिल भारतीय खाटीक समाजाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. अखेर प्रशासनाने ही विनंती मान्य करत गटारीच्या दिवशी दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे.