Human finger In Ice Cream: मुंबईमधील मालाड येथील एका डॉक्टरने ऑनलाइन माध्यमातून मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोट सापडल्याच्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. आईस्क्रीममधील मानवी बोट प्रकरणाची राज्यभर चर्चा असतानाच या प्रकरणाचं पुणे कनेक्शन आता समोर आलं आहे. आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट कोणाचं आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला असून हे बोट कोणाचं आहे याचा उलगडा लवकरच होईल असं चित्र सध्या दिसत आहे. यामागील कारण म्हणजे आईस्क्रीमच्या कारखान्यातील एका कर्मचाऱ्याचं हे बोट असल्याची दाट शक्यता आहे. सदर बोट कोणाचं याची माहिती आता फॉरेन्सिक लॅबमधील अहवालावर अवलंबून आहे.


कुठे आणि कोणाला सापडलेलं बोट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालाडमध्ये राहणाऱ्या ऑर्लेम ब्रेडन सेराओ या 27 वर्षीय डॉक्टरने 12 जून रोजी एका फूड डिलेव्हरी अ‍ॅपवरुन आईस्क्रीम मागवली. ऑर्लेम यांनी मागवलेला आईस्क्रीमचा कोन आल्यानंतर त्यांनी कव्हर उघडून तो खाण्यास सुरुवात केली. मात्र काही क्षणात त्यांना त्या आईस्क्रीमच्या कोनात तुटलेलं हाताचं बोट सापडलं. हे बोट दोन सेंटीमीटर लांब होतं. हा प्रकार समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरु केला आणि हे बोट कोणाचं आहे हे शोधण्यास सुरुवात केली. आईस्क्रीम कंपनीचा ब्रॅण्ड, या आईस्क्रीम कुठे बनवल्या जातात याचा माग काढत काढत पोलीस थेट पुण्याला पोहचले.


पुणे कनेक्शन काय?


तपासामध्ये आईस्क्रीमचा कारखाना पुण्यामध्ये असल्याचं समोर आलं आहे. या तपासादरम्यान कारखान्यामध्ये किती कर्मचारी काम करतात? ज्या आईस्क्रीममध्ये बोट सापडलं तो आईस्क्रीमचा लॉट कारखान्यातून किती तारखेला बाहेर गेला होता? यासारख्या गोष्टींचा माहिती मुंबई पोलिसांनी घेतली. याच तपासामध्ये असं लक्षात आलं की या कारखान्यात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या बोटाला काम करताना दुखापत झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कर्मचाऱ्याच्या बोटाला झालेली जखम अजूनही ताजी आहे. मात्र या कर्मचाऱ्याचा झालेल्या दुखापतीमध्ये त्याच्या बोटाचा तुकडा पडला होता का? पडला होता तर यासंदर्भात तक्रार का करण्यात आली नाही? नेमकं काय घडलं होतं? याची माहिती समोर आलेली नाही. 



रक्ताच्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतिक्षा


दरम्यान, पोलिसांनी या कर्मचाऱ्याच्या रक्ताचे नमुने घेतले असून ते डीएनए चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. आता या डीएनए चाचण्यांनंतर आईस्क्रीममध्ये सापडलेल्या तुटलेलं बोटाचा तुकडा याच कर्मचाऱ्याचा आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.