`काँग्रेसच्या पराजयाची खात्री असल्यानेच राहुल गांधी बँकॉकला जाऊन बसले होते`
पवारांसोबत असलेले उरलेसुरले नेतेही निवडणुकीनंतर पक्ष सोडून जातील.
पुणे: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाची कोणतीही आशा नसल्यामुळे राहुल गांधी बँकॉकला जाऊन बसले होते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते गुरुवारी पिंपरी-चिंचवड येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.
यंदा विरोधकांचा पराभव होणार हे स्पष्ट दिसत असल्याने निवडणुकीतील उत्कंठा पूर्णपणे हरवली आहे. त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राहुल गांधी बँकॉकला गेल्याचे फडणवीसांनी म्हटले. तर शरद पवारांची अवस्था 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, और बचे हुए मेरे पिछे आओ' अशी झाली आहे. त्यांच्या पक्षात फारच मोजके जण उरले आहेत. निवडणूक झाल्यानंतर हे नेतेही पवारांची साथ सोडतील, असे फडणवीसांनी सांगितले.
काँग्रेसचं ठरलं ! राहुल गांधी 'या' दिवशी करणार प्रचाराचा शुभारंभ
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष थकले असल्याचे म्हटले होते. परिणामी भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असा अंदाजही त्यांनी वर्तविला होता. मात्र, तरीही आघाडीचा पराभवच होईल, असे फडणवीस यांनी म्हटले.
उमेदवारांना टेन्शन...अखेर मानसोपचार तज्ज्ञांची मदत
यावेळी फडणवीसांनी आघाडीच्या जाहीरनाम्यावरही टीकास्त्र सोडले. काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात कधीही पूर्ण न होऊ शकणाऱ्या अवाजवी घोषणा केल्या आहेत. आम्ही प्रत्येकाला ताजमहाल देऊ, एवढीच ती काय घोषणा जाहीरनाम्यात राहून गेली, असा टोलाही यावेळी फडणवीस यांनी लगावला.