उमेदवारांना टेन्शन...अखेर मानसोपचार तज्ज्ञांची मदत

निवडणूका म्हणजे तणाव आलाच... तिकिटासाठी संघर्ष, प्रचाराची घाई, आरोप-प्रत्यारोप... सगळंच आलं..

Updated: Oct 10, 2019, 10:43 PM IST
उमेदवारांना टेन्शन...अखेर मानसोपचार तज्ज्ञांची मदत title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : निवडणूका म्हणजे तणाव आलाच... तिकिटासाठी संघर्ष, प्रचाराची घाई, आरोप-प्रत्यारोप... सगळंच आलं... यामुळे ताण एवढा वाढतो की काही जणांना चक्क मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. हा ताण केवळ जय-पराजयाचाच नसतो... 

निवडणूक म्हटली की टेन्शन आलंच. पक्षाच्या नेत्यांना, उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही, लोकांसमोर अत्यंत आत्मविश्वासानं ही नेतेमंडळी वावरत असली तरी आतून मात्र ते घाबरलेले असतात. त्यांना भिती वाटत असते... ही भीती केवळ जय-पराजयाचीच नसते बरं का..

जे सहकारी सोबत दिसतायत, ते खरंच आपले आहेत की विरोधकांचे हेर...सहकारी आपलाच प्रचार करताय की दुसऱ्या कुणाचा... आपण करत असलेलं भाषण प्रभावी तर होतंय ना... मतदारांच्या मनात नेमकं काय आहे... त्यांचा कौल कुणाला आहे... 

बंडखोरीचा आपल्या मतांवर किती परिणाम होतोय..पराभव झाला तर मान-प्रतिष्ठा धुळीला मिळणार नाही ना... समाजमाध्यमांवर आपण ट्रोल तर होत नाहीत ना... 

या ना अशा अनेक शंका-कुशंका उमेदवारांच्या मनात असतात. भाजपाच्या परळीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी ही भीती बोलूनही दाखवली.

पंकजाताईंसारख्या दिग्गज नेत्याच्या मनात भीती असेल तर इतर लहानमोठ्या उमेदवारांची अवस्था काय असेल? त्यांच्यातले काही जण तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊ लागले आहेत. 

केवळ उमेदवारच नव्हे, तर त्यांचं संपूर्ण कुटुंबच निवडणुकीच्या काळात तणावातून जात असतं... जेवण न जाणं, अपचन, निद्रानाश अशा व्याधींचा सामना करावा लागतो. 

अनेक उमेदवारांना खासगीत रडू कोसळतं. चिडचिड वाढते... पण कार्यकर्ते, मतदारांना दुखावण्याच्या भीतीतून राग व्यक्तही करता येत नाही. आणि त्यातून ताण वाढत जातो. तणावाची चेन रिअॅक्शन सुरू होते.

निवडणूक काळात थोडी धाकधुक वाढणं ठीकच...पण त्यामुळे थेट मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं, औषधं घेणं सुरू झालंय... हे जरा अतिच आहे. 

निवडणुका येतात-जातात. कधी यश मिळतं, तर कधी अपयश पदरी पडतं. पण आपली तब्येत सांभाळण्याला या नेतेमंडळींनी प्राधान्य द्यायला हवं.