पुणे: भारतात लॉकडाऊन फेल गेल्याच्या उद्योगपती राजीव बजाज यांच्या वक्तव्याचा माजी खासदार संजय काकडे यांनी चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी लॉकडाऊन केल्यानेच आपला देश आतापर्यंत कोरोनापासून वाचला आहे. अमेरिका, इंग्लंड, स्पेन, इटली यासारख्या देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचे संजय काकडे यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन चा भारतातील परिणाम चांगला की वाईट हे जगातल्या या राष्ट्रांमधील कोरोना रुग्णांची संख्या पाहिली तरी लक्षात येईल. अमेरिकेची लोकसंख्या 32 कोटी असून तिथे 18 लाखांवर कोरोना रुग्ण गेले आहेत. इटलीमध्ये 7 कोटी लोकसंख्येपैकी 2 लाख 34 हजार कोरोना रुग्ण आहेत. इंग्लंड मध्ये 6 कोटी लोकसंख्या असून 2 लाख 80 हजार रुग्ण आहेत. फ्रान्समध्ये 6 कोटी लोकांपैकी 1 लाख 51 हजार लोकांना कोरोना झाला आहे. स्पेनमध्ये 5 कोटी लोकसंख्येपैकी 2 लाख 87 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 


देशातील लॉकडाऊन बिनकामाचा ठरला- राहुल गांधी


या देशांची लोकसंख्या, कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांची आरोग्य सुविधा पाहता भारतात 132 कोटी लोकसंख्येपैकी फक्त सुमारे 2 लाखाच्यावर असलेले कोरोनाबाधित रुग्ण आणि आपली आरोग्य व्यवस्था यांची तुलना केली तर, भारतातील स्थिती अतिशय चांगली असल्याचे दिसते. मुंबई व पुणे वगळता देशात अन्यत्र कुठेही कोरोना रुग्णांची संख्या वाढली नाही. हे लॉकडाऊनचेच यश आहे. मुंबई व पुण्यात रुग्ण वाढण्याचे कारण म्हणजे इथली भरमसाठ लोकसंख्या आहे. त्यामुळे एकट्या जपानचं उदाहरण देऊन राजीव बजाज यांनी देशातील नागरिकांची दिशाभूल करू नये, असेही संजय काकडे यांनी सांगितले.


लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग सध्या आर्थिक मंदीत आहे आणि पुढचे सहा महिने तरी कोरोना जाण्याची लक्षणे नाही. त्यामुळे संपूर्ण जगात आर्थिक मंदी उग्र रूप धारण करेल. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत योजनेमुळे आपल्या देशाला आणि देशातील उद्योजकतेला नवी दिशा मिळणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून त्याचे सकारात्मक परिणामही लवकरच जाणवतील. आर्थिक मंदीतूनही आपण लवकर बाहेर येऊ. त्यामुळे राजीव बजाज यांनी आर्थिक मंदी आणि मोदी सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत नोंदविलेली मतं अर्धवट माहितीच्या आधारावर केलेली आहेत.

राजीव बजाज आणि त्यांचे वडील चांगले उद्योजक आहेत. त्यांना सरकारला काही सूचना करायच्या असतील तर, जरूर कराव्यात. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील ते याबद्दल सांगू शकतात. परंतु, अशा पद्धतीने राजकीय नेत्याचा आसरा घेत चुकीच्या माहितीवर आधारित विधाने करू नयेत. हवं तर, राजीव बजाज यांनी यासंबंधीची माहिती घेण्यासाठी चांगले सल्लागार देखील नेमावेत, असा विनंतीवजा सल्लाही संजय काकडे यांनी राजीव बजाज यांना दिला.