देशातील लॉकडाऊन बिनकामाचा ठरला- राहुल गांधी

लॉकडाऊन उघडल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशी परिस्थिती असणारा भारत जगातील एकमेव देश आहे. 

Updated: Jun 4, 2020, 11:32 AM IST
देशातील लॉकडाऊन बिनकामाचा ठरला- राहुल गांधी title=

नवी दिल्ली: कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाया गेला, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. ते गुरुवारी उद्योगपती राजीव बजाज यांच्यासोबत झालेल्या वेबसंवादात बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, सध्याची परिस्थिती पाहिल्यास  लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुमच्या लक्षात येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशी परिस्थिती असणारा भारत जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे आपण पुन्हा आहे तिथेच आलो आहोत. आता केंद्र सरकार सर्व काही राज्यांवर ढकलून हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली. 
जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले होते. मात्र, भारतात तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्राच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे. 

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३०४ नवे रुग्ण, २६० जणांचा मृत्यू

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच Unlock 1 ची घोषणा केली होती. त्यानुसार आता देशातील कंटेन्मेंट झोन सोडून इतर भागांतील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. मात्र, जून-जुलै या महिन्यांत देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे Unlock 1 कितपत यशस्वी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २६० लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी  वाढ आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा दोन लाखांच्या पुढे गेला आहे.