पुण्यात रंगणार जंगी `सामना`; संजय राऊत घेणार पवारांची मुलाखत
संजय राऊत आणि शरद पवार हे दोन्ही नेते सध्या नागपूरमध्येच आहेत.
पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या सत्ताकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या २९ तारखेला पुण्यातील एका कार्यक्रमात संजय राऊत शरद पवार यांची मुलाखत घेणार आहेत. त्यामुळे राऊतांच्या रोखठोक प्रश्नांवर शरद पवार काय बोलणार, याची उत्सुकता आतापासूनच लोकांना लागली आहे.
गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप सराटी यांच्याकडून कोथरूड साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा संजय राऊत आणि शरद पवारांच्या जुगलबंदीमुळे हा कार्यक्रम विशेष ठरण्याची शक्यता आहे. यावेळी शरद पवार महाविकासआघाडीच्या आगामी वाटचालीसंदर्भात काय भाष्य करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. संजय राऊत आणि शरद पवार हे दोन्ही नेते सध्या नागपूरमध्येच आहेत. हिवाळी अधिवेशनात महाविकासआघाडीची मदत करण्यासाठी हे दोघे नागपूरात ठाण मांडून असल्याची चर्चा आहे.
यापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची मोट बांधून महाविकासआघाडी आकाराला आणण्यात राऊत व पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. राऊत यांच्या आक्रमकपणामुळे भाजपसमोर शिवसेना ठामपणे उभी राहू शकली होती. तर शरद पवार यांनी शिवसेनेला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसश्रेष्ठींना राजी केले होते. तेव्हापासून शरद पवार आणि संजय राऊत यांच्या प्रत्येक कृतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असते.