पुणे: विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या तुलनेत आमचा पावसात भिजण्याचा अनुभव कमी पडला, अशी खोचक टिप्पणी करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पावसाचा आनंद हा मातीशी संबंध असणाऱ्यांनाच होतो, असे त्यांनी म्हटले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, पेरणी सुरु असताना किंवा त्यापूर्वी येणाऱ्या पावसाचा आनंद वेगळा असतो. मातीशी संबंध असणाऱ्यांनाच या पावसामुळे आनंद होतो. मुख्यमंत्र्यांना तसा आनंद झाला नसावा. ते शेतकरी आहेत की नाही, याबाबत आपल्याला कल्पना नाही, असे सांगत श्रीनिवास पाटील यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यात भर पावसात शरद पवारांची सभा


विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगली होती. सातारा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. यावेळी साताऱ्यात भर पावसात शरद पवारांनी घेतलेली सभा चांगलीच गाजली होती. या सभेमुळे साताऱ्यातील हवा बदलल्याची चर्चा होती. 


गरज सरो आणि वैद्य मरो; शिवसेनेचा भाजपला टोला


दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी यावर टिप्पणी केली होती. 'पावसात भिजण्याचा आमचा अनुभव कमी पडला', असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. शरद पवार यांना कुणी 'मॅन ऑफ द मॅच' म्हणतंय, कुणी 'मॅन ऑफ द सीरिज' म्हणतंय पण शेवटी राज्यात सरकार कुणाचं स्थापन होतंय, हेच महत्त्वाचे असल्याचेही फडणवीसांनी म्हटले होते.