मुंबई : आज तुम्ही गुगलच्या होमपेजवर लॉग ऑन केलंत, तर त्याचं डुडल पाहून नक्कीच तुम्हाला कुतूहल निर्माण होईल... तर आजच्या या डुडलमध्ये दिसणारी महिला आहे डॉ. रखमाबाई राऊत... आज त्यांची १५३ वी जयंती... ज्या काळात बाईच्या तोंडून शब्दही बाहेर पडणं कठीण होतं, त्या काळात हिनं एक मोठ्ठा उठाव केला. भारतातली ती पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर... आणि घटस्फोट घेणारी ती पहिली महिला... नो मिन्स नो हे तिनं १८८० सालीच निक्षून सांगितलं होतं.


भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याकाळात बाईला ब्र काढणंही मुश्कील होतं, तो हा काळ.... त्यावेळी बंड करणारी, अनिष्ट चाली-रुढींविरोधात एल्गार पुकारणारी आणि त्यासाठी न्यायाव्यवस्थेला गदगदा हलवणारी ही बाई... डॉ. रखमाबाई भिकाजी राऊत... भारतात डॉक्टरकी म्हणून व्यवसाय करणारी पहिली डॉक्टर अशीही तिची ओळख... भारतातल्या पहिली डॉक्टर होण्याचा मान जरी आनंदीबाई जोशींना मिळत असला, तरी आनंदी जोशींनी डॉक्टरकीची प्रॅक्टिस केली नाही... भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून डॉ. रखमाबाई राऊत हेच नाव इतिहासात लिहिलं गेलं.


'मी माझ्या विठ्ठलाबरोबर राहणार नाही'


रखमाबाईची गोष्ट प्रचंड प्रेरणादायी... अठराव्या शतकात मी माझ्या विठ्ठलाबरोबर राहणार नाही, हे सांगण्याचं धाडस या रखमेनं दाखवलं... रखमाबाईची ही गोष्ट सुरू होते मुंबईत... रखमाबाईंच्या आईचं १४ व्या वर्षी लग्न झालं, १५ व्या वर्षी मूल झालं आणि १७ व्या वर्षी त्या विधवा झाल्या... अवघ्या चार वर्षांत आईची झालेली पानगळ रखमाला माहीत होती... तीच कदाचित बालविवाहाविरोधातल्या असंतोषाची ठिणगी होती... तरीही ११ व्या वर्षी रखमाबाईंचं लग्न १९ वर्षांच्या दादाजी भिकाजी यांच्याशी लग्न लावून देण्यात आलं. त्यानंतर रखमाच्या आईनं दुसरं लग्न केलं. रखमाचे सावत्र वडील डॉक्टर सखाराम अर्जुन हे सुदैवानं मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारे होते... लग्न झाल्यावरही रखमा माहेरीच राहात होती... आणि शिकतही होती. रखमाचा नवरा अतिशय वाईट प्रवृत्तीचा आणि बाहेरख्याली होता... म्हणूनच त्याच्याबरोबर राहायचं नाही, असा निर्णय रखमानं घेतला.


भारतातला पहिला घटस्फोटाचा खटला


रखमा आपल्याबरोबर राहात नाही म्हणून तिच्या नवऱ्यानं बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली. १८८४ साली भारतातल्या पहिल्या घटस्फोटाचा खटला बॉम्बे हायकोर्टात सुरू झाला... मी माझ्या नवऱ्याबरोबर राहणार नाही, हे रखमेनं कोर्टाला ठासून सांगितलं. कोर्टानं रखमेला दोन पर्याय दिले... 'एक तर तू तुझ्या नवऱ्याबरोबर त्याच्या घरी राहायला जा... नाही तर कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाहीस तर तुरुंगात जा...' त्यावेळी, या लग्नामध्ये राहण्यापेक्षा मी तुरुंगात जाईन, असं रखमाबाईंनी कोर्टाला ठणकावलं.


रखमाचा अभूतपूर्व युक्तीवाद


'नो मिन्स नो' हा अलीकडच्या पिंक सिनेमातला अमिताभचा गाजलेला डायलॉग रखमेनं अठराव्या शतकातच वापरला होता. त्या काळी हा खटला प्रचंड गाजला. तत्कालीन ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी त्याला प्रचंड प्रसिद्धी दिली होती. 'लग्न म्हणजे काय, हे कळण्याचंही माझं वय नाही, त्या वयात माझ्यावर हे लग्न लादलं गेलं, त्यामुळे माझ्यावर या लग्नाची जबरदस्ती केली जाऊ शकत नाही' हा तिचा युक्तीवाद त्याकाळी अभूतपूर्व ठरला.


विचारवंतांची मिळाली साथ


तत्कालीन समाजाला सणसणीत चपराख देणारा हा युक्तीवाद होता. बॉम्बे हायकोर्टात सर्वाधिक गाजलेल्या खटल्यांमध्ये या युक्तीवादाचा समावेश होतो. या खटल्यात रखमेला साथ देण्यासाठी अनेक समाजसुधारक पुढे आले. बेहरामजी मलबारी, रमाबाई रानडेंनी पुढे येऊन रुकमाबाई संरक्षण समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून रखमाबाईंची खटला जगापुढे आणण्याचा आणि बालविवाहाविरोधात जनजागृती करण्यात आली. त्यावेळी पंडिता रमाबाई लिहितात... 'मुलींसाठी शिक्षण आणि त्यांचं सबलीकरण सरकारनं सुरू केलंय, पण जेव्हा एखादी महिला गुलामी करणं नाकारते, त्यावेळी मात्र सरकार तिचं खच्चीकरण करतं... आणि कायदाही त्या महिलेचे पाय खेचण्याचंच काम करतो'


'लग्न लादलं जातंय'


हा खटला सुरू असताना २६ जून १८८५ ला रखमाबाईंनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला एक पत्रंही लिहिलं, त्यात त्या म्हणतात... 'बालविवाहाची या अनिष्ट प्रथेनं माझ्या आयुष्यातला आनंदच हिरावून घेतलाय. मला जे काही शिकायचंय, आयुष्यात बरंच काही करायचंय, पण हे लग्न त्या सगळ्याच्या आड येतंय. माझा काहीही दोष नसताना माझ्यावर हे लग्न लादलं जातंय'


घटस्फोटाचा इतिहास


चार वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला... या लग्नातून रखमेला मुक्त करण्यासाठी दादाजीनं पैसे घेतले.... आणि रखमा या लग्नातून मोकळी झाली. तिथेही इतिहास घडला... आताच्या काळातही नवऱ्याकडून बायकोला पोटगी मिळते. पण भारतातल्या पहिल्या घटस्फोटाच्या खटल्यात रखमेनं तिच्या नवऱ्याला पैसे दिले आणि सेटलमेंट केली. त्यावेळी रखमेला अनेक समाजसुधारकांनी खटल्यासाठीचे पैसे देण्याची तयारी दाखवली, पण रखमेनं ती नाकारली... ब्रिटीशांचं राज्य असलेल्या भारतातला हा खटला अनेकार्थानं ऐतिहासिक ठरला... लग्नावेळी मुलीचं वय, सहमती आणि तिची निवड याबद्दल यानिमित्तानं पहिल्यांदाच बोललं गेलं.


फिनिक्स भरारी


या लग्नातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या रखमेनं त्यानंतर फिनिक्स भरारी घेतली. रखमेनं आधी इंग्रजीचं शिक्षण घेतलं आणि १८८९ साली London School of Medicine for Women मध्ये तिनं प्रवेश घेतला. १८९४ साली डॉक्टर होऊन ती भारतात परतली. सूरतमध्ये मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून तिनं भूमिका बजावली. तिनं परत लग्न केलं नाही आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत सामाजिक कार्यात ती सक्रिय राहिली. ९१ व्या वर्षी डॉ. रखमाबाई राऊत यांचं निधन झालं.


प्रेरणादायी प्रवास


डॉ. रखमाबाई राऊतांचा हा प्रवास, हा लढा अनेक महिलांसाठी प्रेरणा देणारा ठरला... रखमाबाईच्या न्यायालयीन लढ्यामुळे १८९१ सालचा Age of Consent Act प्रत्यक्षात आला. रखमाबाईंकडून प्रेरणा घेऊन त्या काळात अनेक महिलांनी डॉक्टरकीची आणि सामाजिक कार्याची वाट धरली... अठराव्या शतकात जी अशक्य कोटीतली गोष्ट होती, ती रखमेनं करुन दाखवली... तिचा तो उठाव, ते बंड आणि तो आत्मविश्वास यामुळेच भविष्यातलं चित्र बदललं.