दरवर्षी नव्यानं भेटणारा, हवाहवासा वाटणारा `तो`...
पहिल्या पावसाच्या सरींनी वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झालाय... पहिल्या पावसानं सगळं चिंब चिंब होऊन गेलंय... पावसाळा नेमेचि येतो, पण तरीही दरवर्षी येणारा पहिला पाऊस पहिल्यांदाच नव्यानं भेटतो.
मुंबई : पहिल्या पावसाच्या सरींनी वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झालाय... पहिल्या पावसानं सगळं चिंब चिंब होऊन गेलंय... पावसाळा नेमेचि येतो, पण तरीही दरवर्षी येणारा पहिला पाऊस पहिल्यांदाच नव्यानं भेटतो.
पहिला पाऊस आनंदाची बरसात घेऊन येतो... वाजतगाजत आणि धसमुसळेपणा करत येतो... पहिल्या पावसातला मातीचा गंध वातावरण सुगंधी करून टाकतो... पावसाच्या थेंबासाठी आसुसलेल्या चातक पक्षाची तहान भागवतो... आणि आभाळाकडं डोळं लावून बसलेल्या बळीराजाची प्रतीक्षा संपवतो. ग्रीष्माच्या उन्हानं होरपळलेली धरित्री पहिल्या पावसाच्या शिडकाव्यानं मोहरून जाते... आणि शहरातला काळा डांबरी रस्ताही गारेगार होऊन जातो... पहिल्या पावसाच्या आगमनानं मनात आठवणींचे ढग फेर धरून नाचू लागतात... पहिल्या पावसाचे टपोरे थंब चेहऱ्यावर स्मितहास्याची लकेर उमटवतात.
चातकापेक्षाही जास्त तन्मयतेनं पहिल्या पावसाची वाट पाहणारं प्रेमी युगूल घरातून बाहेर पडतं. पाऊसधारा झेलत झेलत बाइकवरून फिरायला निघतं... कुणी बसस्टॉपच्या कडेला, कुणी कॉफीशॉपच्या टेबलावर, कुणी रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीत, तर कुणी गार्डनमधल्या आडोशाला खेटून उभं राहतं.
समुद्रातल्या लाटांचा खेळ बघायला मित्रांच्या झुंडी सीफेसकडं वळतात... कुणी घरातच गरमागरम चहा आणि भज्यांचा बेत करतं... कुणी सोसासटीच्या आवारातच मनसोक्त भिजतं... कच्चा-बच्चांची कागदाच्या होड्या करण्याची लगबग सुरू होते... आणि उधाणलेल्या दर्यातली खरीखुरी होडी धक्क्याच्या दिशेनं तरंगू लागते... कपाटावर ठेवलेल्या छत्र्या, कपाटात ठेवलेला रेनकोट बाहेर काढला जातो... आणि पावसाशी मुकाबला करायला आपणही सिद्ध होतो.
दरवर्षीच येतो 'तो'... पण नव्यानं... आणि पुन्हा एकदा आठवणींचं तळं तुडुंब भरून ओसंडून वाहू लागतं.