स्पॉटिंग आणि पिरीयड ब्लिडींगमधला फरक कसा ओळखावा? जाणून घ्या
मासिकपाळीच्या मध्ये स्पॉटिंग होण्यामागे अनेक कारणं आहेत.
मुंबई : प्रत्येक महिलेला महिन्यातून मासिक पाळीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. काही वेळा महिलांना मासिक पाळीव्यतिरिक्त हलकसं ब्लिडींग होतं. याला स्पॉटिंग म्हणतात. मासिकपाळी येऊन गेल्यानंतर जर स्पॉटिंग झालं तर लवकर पिरियड्स आले असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे ब्रेकथ्रू ब्लिडींग असू शकतं.
मासिकपाळीच्या मध्ये स्पॉटिंग होण्यामागे अनेक कारणं आहेत. यामध्ये स्ट्रेस, गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये केलेला बदल यामुळे स्पॉटिंग होतं. परंतु, पिरियड ब्लिडींग आणि स्पॉटिंग मधला नेमका फरक कसा ओळखावा हे आपण जाणून घेऊया.
रक्तस्त्राव योग्य प्रमाणात झाला की, मासिक पाळी आल्याचं कळतं. शिवाय यामुळेच पिरियड ब्लीडींग आणि ब्रेकथ्रू ब्लीडींग मधील फरक समजतो.
स्पॉटिंग म्हणजे अगदी कमी होणारा रक्तस्त्राव. यामध्ये रक्तस्राव होण्याचं प्रमाण फार कमी असून त्याचा कालावधीही कमी असतो. मासिकपाळीतील स्त्राव आठवडाभर किंवा 5 दिवस होतो. स्पॉटिंग फक्त दोन दिवसच होऊ शकतो. त्यामुळे स्पॉटिंग होत असल्यास एक्सट्रा पॅड वापरण्याची गरज नाही.
काही वेळा गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरवात केल्यास स्पॉटिंग होऊ शकतं. गोळ्या बदल्यानंतर पहिले काही दिवस हा त्रास होऊ शकतो.
दुसरीकडे मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेत असाल तर तुम्हाला ब्रेकथ्रू ब्लिडींग होण्याची शक्यता आहे. तसंच गर्भनिरोधक गोळ्या घेणे राहून गेल्यास देखील स्पॉटिंग होतं. त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या वेळेवर घ्या.