मुंबई : यंदाचं वर्ष मागे सरतंय... नवीन वर्ष सुरू होतंय... तुमचे अनेक संकल्पही नवीन वर्षाच्या निमित्तानं सुरू झालेच असतील. नवे दिवस, नवे महिने, नवे ऋतू आणि बरंच काही... येणाऱ्या दिवसांचा खऱ्या अर्थानं आनंद लुटण्यासाठी तुम्ही सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे... आणि त्यासाठी फार काही मेहनत घ्यायचीही गरज नाही. अगदी सोप्या आणि छोट्या उपयांमधून तुम्ही स्वत:ला सकारात्मक ठेवू शकता... 


१. सकारात्मक मित्रमंडळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या आजुबाजुला अनेक गोष्टी घडत असतात. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तुमच्या विचारांवरही परिणाम होत असतो. तुम्ही जिथे राहता, जिथे काम करता किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून नकारात्मक आणि हिंस्र गोष्टींचा तुमच्यावर अप्रत्यक्षपणे मारा होत असतो. विविध प्रकारची माहिती तर तुमच्यावर आदळत असते. अशा वेळी नकारात्मकता निर्माण करणाऱ्यांना जरा बाजुला सारून तुम्हाला हसतं पाहण्याची इच्छा असणाऱ्या लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा. विश्वसनीय लोकांसोबत मनमोकळेपणानं बोला. आपल्या प्रश्नांवरून सतत रडणाऱ्या आणि कुढणाऱ्या लोकांपेक्षा त्यावर उपाय शोधणाऱ्या माणसांना तुम्हाला हुडकायचंय... 


२. साधं भोजन - सकारात्मक जीवन


हे वाक्य तुम्ही अनेकदा ज्येष्ठांकडून ऐकलं असेल... आणि ते खरंही आहे. येणाऱ्या वर्षात भरपूर चटपटीत, मसाल्याचे पदार्थ आणि तेलकट पदार्थ खाण्याचं टाळाच... त्याऐवजी हिरव्या भाज्या, कमी मसालेदार पदार्थांची निवड करा. हे पदार्थ तुमच्या शरीरासोबतच तुमचे विचारही सदाहरीत ठेवतील. तणावापासून दूर राहण्यासाठी हे पदार्थ मदत करतात.


३. रोजचं वर्कआऊट


नकारात्मक विचारांतून आणि तणावातून बाहेर पडण्यासाठी व्यायाम हा नेहमीच फायदेशीर ठरतो. २०२० मध्ये दिवसातली कमीत कमी ३० मिनिटे आपल्या शरीरासाठी द्या... या ३० मिनिटांत महागड्या जीममध्ये जाऊनच व्यायाम करायला हवा असं काही नाही. चालणं किंवा धावणं हे असे वर्कआऊट आहेत ज्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाहीत. दररोज १०,००० पावलं चालल्यानं आरोग्यदायी राहू शकाल.


४. शक्य होईल तेवढं सोशल मीडियापासून दूरच राहा


तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त नकारात्मकता कुठून येत असेल तर ते सोशल मीडिया आहे. कधीकधी तुम्हाला नको असलेल्या गोष्टीही अचानक तुमच्यासमोर अतिशय हिंस्र आणि क्रूर पद्धतीनं येतात आणि काही काळ तुम्ही अतिशय बेचैन होत असाल तर हीच वेळ आहे... सरळ तुमचा मोबाईल, लॅपटॉप बाजुला ठेवून द्या आणि काही वेळ तुमच्या कुटुंबासोबत आणि आवडत्या माणसांसोबत व्यतीत करा.



५. इतरांची मदत करा


तुम्ही जेव्हा इतरांची मदत करता तेही कोणत्याही उपकाराच्या भावनेशिवाय तेव्हा तुम्ही खऱ्या जगण्याला प्रारंभ करता. इतरांची मदत करण्याची भावनाच इतकी सकारात्मक आहे की तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. ही मदत प्रत्येक वेळी आर्थिक असेलच असं नाही... आपल्या गाडीतून लिफ्ट द्या, एखाद्याला रस्ता शोधण्यासाठी मदत करा, एखाद्याच्या कठिण प्रसंगी त्याला सावरण्यासाठी पुढे व्हा... पण कोणत्याही अपेक्षाविना... आणि मग बघा तुमच्या प्रश्नांचीही उत्तरं तुम्हीच शोधून काढाल... ते केवळ सकारात्मकतेच्या जोरावर.