ब्रिटनच्या मंत्रिमंडळात तीन भारतीय वंशाच्या खासदारांचा समावेश
पाकिस्तानी वंशाचे साजीद जावीद यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची धुरा
लंडन: ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात तीन भारतीयांची महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागली आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांना ट्रेजरी मंत्रालयामध्ये मुख्य सचिवपदी नेमण्यात आले आहे.
जॉन्सन यांच्या खंद्या समर्थक प्रीती पटेल यांना गृहखात्याचा कारभार सोपवण्यात आलाय. तर ५१ वर्षांचे आलोक शर्मा यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विकास खाते देण्यात आले असून त्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे.
प्रीती पटेल या ब्रेक्झिट आणि बोरीस जॉन्सन यांच्या खंद्या समर्थक आहेत. २०१७ साली त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. गृहमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या पटेल या पहिल्या भारतीय वंशाच्या व्यक्ती ठरल्या आहेत.
मूळच्या गुजराती असणाऱ्या पटेल या ब्रिटनमधील भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. भारतीयांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना पटेल आवर्जून उपस्थित राहतात. पटेल या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंद्या समर्थक आहेत.
दुसरीकडे पाकिस्तानी वंशाचे साजीद जावीद यांना मोठी बढती देण्यात आली असून त्यांना थेट ब्रिटनचे अर्थमंत्री करण्यात आले आहे.