Corona Virus : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण हा आतापर्यंतचा सर्वात प्रभावी उपाय ठरतोय.  अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवली जात आहे. प्रत्येकाने संपूर्ण लसीकरण करावं असं वारंवार आवाहनही केलं जात आहे. पण अजूनही असे अनेक जण आहेत, ज्यांनी लसीचा पहिला डोसही घेतलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतल्या लॉस एंजल्समध्ये एका व्यक्तीच्या कोरोना प्रतिबंधक लस न घेणं जीवावर बेतलं आहे. कोरोनाची लागण झाल्याने ४० वर्षीय ख्रिश्चियन कॅबरेरा याचा मृत्यू झाला. तीन वर्षांच्या मुलाचा तो पिता आहे. कोरोनाची लस घेतली नसल्याचा त्याला पश्चाताप झाला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.


मृत्यूपूर्वी अखेरचा संदेश
ख्रिश्चनचा भाऊ गिनोने सांगितलं की त्याने कोरोनाची लस घेतली नव्हती, तो नेहमी म्हणत असे की मी आजारी पडणार नाही. ख्रिश्चियनचा विज्ञानावर विश्वास नसल्याचं त्याचा भाऊ म्हणतो. पण मृत्यूच्या आदल्या रात्री ख्रिश्चियने आपल्या भावाला एक संदेश पाठवला. त्यात त्याने म्हटलं होतं, 'मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, मला श्वास घेता येत नाही, मी लस घेतली नाही याबद्दल मला आता खंत वाटतेय. मी लस घेतली असती तर आज माझा जीव वाचला असता'.



 
कोरोना संसर्गामुळे तब्येत खालावली
२२ जानेवारीला ख्रिश्चियनचा मृत्यू झाला. डिसेंबरमध्ये ख्रिसमस दरम्यान ख्रिश्चियनला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.