Lockdown : कौटुंबिक संबंधांवर परिणाम; ब्रिटनमध्ये घरगुती हिंसेत वाढ
भारतात एका रिपोर्टद्वारे लॉकडाऊनमध्ये वाढत्या घरगुती हिंसेवर प्रकाशझोत टाकण्यात आला
लंडन : कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणामही संपूर्ण जगभरात दिसतो आहे. पण या लॉकडाऊनमध्ये एक नकारात्मक बाबही समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे लोक घरांमध्येच मर्यादित असल्याने त्याचा कौटुंबिक संबंधांवर परिणाम होत असल्याचं चित्र आहे. भारतात एका रिपोर्टद्वारे लॉकडाऊनमध्ये वाढत्या घरगुती हिंसेवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. त्यानंतर आता ब्रिटनमधूनही अशा प्रकारच्या हिंसेबाबतची माहिती समोर आली आहे.
लंडनमध्ये 9 मार्च ते 19 एप्रिलपर्यंत घरगुती हिंसेबद्दल जवळपास 4093 लोकांना ताब्यात घेण्यात आलं. म्हणजेच जवळपास एका दिवसांत 100 लोकांना अटक झाली. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी घरगुती हिंसेत मोठी वाढ झाल्याचं सांगण्यात आलं. कोविड-19मुळे लोक घरांतच सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. 9 मार्चपासून या हिंसेत जवळपास 24 टक्क्यांची वाढ झाली असून ही अतिशय चिंतेची बाब ठरत आहे.
कौटुंबिक कलहातून उद्भवणाऱ्या घरगुती हिंसाचारासंबंधी प्रकरणांचा पोलिसांना दररोज सामना करावा लागतो आहे. घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ब्रिटीश संसदीय समितीने सोमवारी सरकारकडून तातडीने कार्यवाही करण्याचं आवाहन केलं आहे. समितीने सरकारला घरगुती हिंसाचार समोर ठेवून धोरण तयार करण्यास सांगितलं आहे, जेणेकरून लॉकडाऊन कालावधी आणि त्यानंतरही अशा घटना टाळण्यासाठी त्वरित कार्यवाही करता येईल.
दरम्यान, ब्रिटनमध्ये 1 लाख 54 हजार 37 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत तब्बल 20 हजार 794 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनसारख्या कठोर उपाययोजनांदरम्यान, महिलांवरील वाढते अत्याचार ही अतिशय गंभीर आणि चिंता वाढवणारी घटना असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलंय. UN महासचिव एंटोनियो गुटेरेस António Guterres यांनी, साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी राबवलेल्या उपायांदरम्यान देशांमध्ये महिलांविरुद्धचे गुन्हे वाढले आहेत. सरकारने साथीच्या रोगाचा सामना केलाच पाहिजे मात्र त्यासोबतच स्त्रियांची सुरक्षा देखील सुनिश्चित केली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.