मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील ६ कोटीहून अधिक लोकं गरिबीच्या दलदलीत अडकतील असा गंभीर इशारा विश्व बॅंकेने मंगळवारी दिला. या जागतिक संकटातून वाचण्यासाठी १०० विकसनशील देशांना १६० कोटी अब्ज डॉलरची मदत केली जाणार आहे. पंधरा महिन्यांच्या आत ही रक्कम पोहोचणार असल्याचेही विश्व बॅंकेने स्पष्ट केले. विश्व बॅंकेचे अध्यक्ष डेविड मालपॉस यांनी एका कॉन्फरन्स कॉल दरम्यान ही माहीती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या संकटामुळे विकसित अर्थव्यवस्था बंद झाल्याने ६ कोटीहून अधिक लोकं गरिबीच्या दलदलीत फसतील. गरिबी नष्ट करण्याच्या दिशेने आम्ही जी काही पाऊलं उचलली होती त्यात अडथळा येईल असे डेविड मालपॉस म्हणाले. 


विश्वबॅंकेने या दिशेने वेगाने पाऊले उचलली असून शंभरहून अधिक देशांसाठी आपत्कालिन सहायता अभियान सुरु केले आहे. यासाठी १६० अब्ज डॉलरची रक्कम १५ महिन्यात दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले. या शंभर देशांमध्ये जगातील ७० टक्के लोकसंख्या येते . यात ३९ भाग हे आफ्रीकेच्या उपसहारातील आहेत. या रक्कमेच्या एक तृतीयांश रक्कम अफगाणिस्तान, चाड, हैती आणि नायजर सारख्या नाजूक स्थिती असलेल्या ठिकाणी देण्यात येतील. 



गरिबांच्या मदतीसाठी रोख रक्कम तसेच इतर सहायता, खासगी क्षेत्र सुरु करणे, अर्थव्यवस्था मजबूत करणे महत्वाचे असल्याचे मतं त्यांनी व्यक्त केले. 


या १० देशात लाखो रुग्ण 


कोरोना विषाणूच्या बाबतीत, १५ लाखाहून अधिक रुग्णांसह अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. यानंतर २.९० लाखांपेक्षा जास्त रुग्ण रशियात आहेत. तिसर्‍या क्रमांकावर स्पेन आहे, जेथे २.७८ लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहे. ब्रिटनमध्ये २.४६ लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. ब्राझीलमध्ये २.४५ लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.


इटली सहाव्या क्रमांकावर असून येथे २.२ लाखाहून अधिक रुग्ण आहेत. त्याखालोखाल फ्रान्सचा सातवा क्रमांक आहे, जेथे १.७९ लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. आठव्या क्रमांकावर जर्मनी १.७७ लाख, नवव्या क्रमांकावर तुर्की १.५० लाख तर इराण १.२२ लाख रुग्णांसह दहाव्या क्रमांकावर आहे.