देशाला बसला भूकंपाचा हादरा; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
या भागात त्सुनामीचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : भुकंपाच्या जबर हादऱ्यामुळं तुर्की आणि ग्रीस या दोन्ही देशांमध्ये कमालीचं भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. या भूकंपाची तीव्रता ७ रिश्टर स्केल असल्याचं अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेनं सांगितलं. अनेक इमारती आणि घरांचं या आपत्तीमध्ये नुकसान झालं असून, सध्या या भागात बचावकार्याला वेग आला आहे. भूकंपाच्या नंतर परिस्थिती पाहता या भागात त्सुनामीचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या विनाशकारी भूंकपामुळं इजमिर शहराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर, यामध्ये आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय या घटनेमध्ये शंभरहून अधिकजण जखमी असल्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. सध्या हाती आलेल्या माहिनुसार, आत्तापर्यंत या भूंकपात चार जणांचा मृत्यू झाला असून १२० लोक जखमी झाले आहेत.
युरोपीय भूमध्यसागर भूकंप संशोधन केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू युनानच्या उत्तर पूर्वेला सामोस द्वीप बेटांमध्ये होता. सोशल मीडियावर या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले. ज्यामध्ये नुकसानाची तीव्रता पाहता येत आहे.
दरम्यान, तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी ट्वीट करुन दिलेल्या माहितीनुसार या भूंकपामुळे ६ इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.