नवि दिल्ली : भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून बालकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळांवर हल्ला चढवल्यानंतर पाकिस्तानकडून बुधवारी सकाळी लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसवण्यात आली. या पैकी एक विमान भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाडले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतातील बहुतांश विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, डेहराडून, अमृतसर, चंदीगड आणि जम्मू विमानतळांवरील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली आहे. लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांना दक्षतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव वाढला असल्यामुळे सध्या सीमावर्ती भागात सर्व ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.आजपासून २७  मे महिन्यापर्यंत जम्मू-काश्मिर आणि पंजाबचे सर्व विमानतळ बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याचबरोबर परिस्थिती लक्षात घेवून पुढील निर्णय घेतले जातील असे सांगण्यात आले होते. आता मिळालेल्यानूसार विमान तळांवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, जम्मू आणि श्रीनगरच्या दिशेने निघालेल्या विमानांना पुन्हा त्यांनी जिथून उड्डाण केले होते, त्या विमानतळावर परत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीहून जम्मू-काश्मीरकडे निघालेल्या इंडिगो आणि गो एअरच्या विमानांना दिल्ली विमानतळावरच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. श्रीनगर विमानतळावरील विमानसेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत उड्डाणे बंद करण्यासाठी श्रीनगर विमानतळाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डांणावर परिणाम होताना दिसत आहेत. काही उड्डाणे रद्द करण्यात आली असून, काही विमानांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले जात आहेत.


पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय वायुदलाकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. हवाई हल्ल्याच्या काही तासांनंतरच भारतीय सीमेजवळ पाकिस्तानकडून तुफान गोळीबार करण्यास सुरुवात करण्यात आली. पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय वायुसेनेच्या विमानाला जम्मू- काश्मिरच्या बडगाम येथे अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या दुर्घटनेत वायुदलाचे वैमानिक आणि सहवैमानिक शहीद झाले आहेत. विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.