Coronavirus in china : जगात कोरोना पुन्हा थैमान घालण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाचा अनेक देशात उद्रेक झाला आहे. ( Coronavirus) पण हा केवळ ट्रेलर आहे. कोरोना पुन्हा थैमान घालेल आणि मृत्यूदरही कमालीचा वाढण्याची भीती आहे, असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय. तर चीनची 60 टक्के तर जगाची 10 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात सापडणार आहे. ( Coronavirus News) तर  धक्कादायक बातमी म्हणजे चीनमध्ये येत्या 90 दिवसांत तब्बल 90 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते, असा दावा करण्यात येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कोरोनाची नवी लाट सध्या चीन, जपान, अमेरिकेत थैमान घालत  आहे. या लाटेचा वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. भारत सरकारही सध्या अलर्ट मोडवर आहे. पुढील तीन महिन्यात जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के तर चीनच्या एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के जनतेला कोरोनाची लागण होईल, असा इशारा देण्यात आला आहे. सध्याची स्थिती ही केवळ साथीची सुरुवात आहे, असे अमेरिकेतल्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.


कोरोनाची लाट पुन्हा जगभरात थैमान घालेल आणि जगाची 10 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात सापडणार आहे. चीन, अमेरिका, युरोप, दक्षिण कोरिया आणि जपानमधल्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही तर फक्त सुरुवात आहे.  लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची भीती वैज्ञानिकांना आहे. अमेरिकेचे वैज्ञानिक डॉक्टर एरिक डिंग यांनी ट्विट करत हा दावा केलाय. 


चीनमध्ये 60 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात!


चीनमधली हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांनी भरुन गेली आहेत. तर अमेरिका आणि युरोपमध्ये तापाच्या आणि अंगदुखीच्या गोळ्यांची मोठी कमतरता जाणवतेय. त्यामुळे औषध विक्रीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. पुढच्या काळात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह आहेत.चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं अक्षरश: धुमाकूळ घातलाय. चीनप्रमाणेच हा व्हेरियंट इतर देशांमध्येही पसरला तर काय? नुसत्या कल्पनेनं जगभरातील संशोधकांचा थरकाप उडालाय. या नव्या व्हेरियंटमध्ये सातत्यानं बदल होतोय. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कसा रोखायचा याची चिंता संशोधकांना सतावतीय.


चीनमध्ये ज्या पद्धतीनं रुग्णवाढ होतीय हे लक्षात घेता येत्या 90 दिवसात इथली 60 टक्के लोकसंख्या म्हणजेच जवळपास 90 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते असा दावा साथरोगतज्ज्ञ एरिक फिगल डिंग यांनी केलाय. या कालावधीत लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशीही भीती डिंग यांनी व्यक्त केलीय. तर साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं 1 ते 20 डिसेंबर दरम्यान चीनमध्ये तब्बल 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा केलाय. 


भारतात सर्तकता, मॉकड्रिलअंतर्गत चाचपणी होणार 


भारतात कोरोनाचा उद्रेक झाल्यास त्यासोबत लढण्यासाठी यंत्रणा किती सज्ज आहे, याची मॉकड्रिल केली जाणार आहे. या मॉकड्रिलअंतर्गत रुग्णालयातल्या वैद्यकीय तयारीची चाचपणी होणार आहे. कोरोना रुग्णांसाठी साधे तसंच व्हेंटिलेटर बेड्स किती आहेत. ऑक्सिजन प्लँट आणि ऑक्सिजन सिलिंडर किती प्रमाणात उपलब्ध आणि कार्यान्वित आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मनुष्यबळ किती आहे याची माहिती घेतली जाणार आहे. सरकारने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांकडून या सर्व व्यवस्थेची पाहणी केली जाणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने सर्व माहिती कोव्हिड 19 पोर्टलवर अपडेट केली जाणार आहे.