Salary Hike : `या` कंपनीकडून अवघी 605 रुपये पगारवाढ, तरीही कर्मचारी आनंदी, असं का?
Salary Hike : नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच Appraisal न होणं किंवा ते अगदीच कमी होणं याचं दु:ख ठाऊक असावं. वर्षभर याच पगारवाढीसाठी जीवाचा आटापिटा करून काम केलं जातं. पण, समजा पगारवाढच झाली नाही तर?
Salary Hike : नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच किमान (Appraisal) पगारवाढीची अपेक्षा असते. दरवर्षी कंपनीच्या (Economic year) आर्थिक वर्षाला अनुसरून ही पगारवाढ केलीसुद्धा जाते. पण, अनेकदा काही कारणांनी मनाजोगी पगारवाढ मिळत नाही. अशा वेळी नोकरी बदलणं, मालकाशी हुज्जत घालणं किंवा मग नाईलाजानं त्याच पगारात नोकरी करणं हे असं काहीतरी केलं जातं. पण, नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळं असं चित्र समोर आलं आहे, की कर्मचारीही कंपनीची बाजू समजून घेऊ शकतात. ही कोणा चित्रपटाची स्क्रीप्ट नाही, तर ही प्रत्यक्षात घडलेली घटना आहे.
कंपनीकडून कर्मचाऱ्यांना पगारवाढ म्हणून फक्त 605 रुपये?
चीनमधील (China) एका कंपनीनं तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त 50 युआन म्हणजेच भारतीय परिमाणानुसार 605 रुपये इतकीच पगारवाढ दिली. पण, तरीही इथं काम करणारा प्रत्येकजण कंपनीची प्रशंसा करत आहे, कुणीही निराश नाही. हे असं का? यामागचं कारण अतिशय रंजक आहे.
चीनमधील स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार तेथील मॅक्सिन (Meixin) या कंपनीनं कर्मचाऱ्यांना अवघी 50 युआन इतकीच पगारवाढ केली आहे. पण, कंपनीनं ज्या प्रकारे यामागचं स्पष्टीकरण दिलं आहे, ते पाहून कर्मचाऱ्यांनी नाराजीचा सूर अजिबातच आळवलेला नाही. सोशल मीडियावर सध्या या कंपनीची एकच चर्चा सुरु आहे.
कर्मचाऱ्यांची माफी मागणारी कंपनी...
मॅक्सिन कंपनीकडून साधारण 6 हजार कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि नेटकऱ्यांनी या कंपनीच्या अडचणी समजून घेतल्या, कंपनीची प्रशंसा केली. 'आम्ही आशा करतो की आपण नफा आणखी वाढवण्यासाठी एकजुटीनं काम करु. हळुहळू का होईना पण आपण स्वाभिमानाचं आयुष्य जगू', असं या कंपनीकडून सांगण्यात आलं.
हेसुद्धा वाचा : Tech Layoffs: कसली पगारवाढ अन् कसलं काय! आणखी एक IT Company 11000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ
जिथं अनेक कंपन्यांचे एचआर, व्हीलन ठरतात तिथं या कंपनीच्या एचआरकडून मात्र आपल्यापुढे असणारी आव्हानं मांडत कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्ही शक्य नसतानाही कमीत कमी का असेना पण पगारवाढ देत आहोत, असंही त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं. कंपनीकडून कठीण प्रसंगातही कर्मचारी कपात न करता त्यांच्या नोकऱ्या कायम ठेवत घेण्यात आलेला हा निर्णय सध्या अनेकांचीच वाहवा मिळवून जात आहे.
सोशल मीडियावर कंपनीचं कौतुक
जिथं (Microsoft) मायक्रोसॉफ्ट, गुगलसारख्या (Google) बड्या कंपन्यांकडून सातत्यानं कर्मचारी कपात करण्यात येत आहे. तिथेच काही छोट्या कंपन्यांनी मात्र माणुसकीचं नातं जपत कर्मचाऱ्यांना कामावरून न काढण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नव्हे, तर थोडीथोडकी का असेना पण त्यांना पगारवाढही लागू केली आहे. आहे की नाही ही कौतुकाची बाब?