सुनंदन लेले, केपटाऊन, दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्तांतर झालंय. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या जेकब झुमा यांना राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलंय. त्यांच्या जागी नेल्सन मंडेलांचे खंदे कार्यकर्ते सिरिल रामाफोसा नवे अध्यक्ष झालेत. त्या देशाला रामाफोसा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.


सिरिल रामाफोसा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिरिल रामाफोसा. दक्षिण आफ्रिकेतले एक यशस्वी उद्योजक... सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष... सामान्य जनतेचे लाडके नेते... आणि आता दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष. नेल्सन मंडेलांच्या देदिप्यमान कारकीर्दीनंतर त्यांच्या खुर्चीत बसलेले जेकब झुमा यांनी स्वतःचेच खिसे भरण्याचा उद्योग केला. त्यामुळे पक्षाचा आणि जनतेच्या त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता. 


दबावापुढे झुमा झुकले


अखेर या दबावापुढे झुमा झुकले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आफ्रिकन नॅशनल काँग्रेसनं रामाफोसा यांची एकमतानं अध्यक्षपदासाठी निवड केली. संसदेमध्ये पाशवी बहुमत असल्यामुळे राष्ट्राध्यक्षपदी बिनविरोध निवडून यायला त्यांना काहीच अडचण पडली नाही. 


मंडेलांच्या लढ्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणाऱ्या रामाफोसा यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती कामगार चळवळीतून. नॅशनल युनियन ऑफ माईनवर्कर्स या कामगार संघटनेचे ते पहिले महासचिव... आपल्या 10 वर्षांच्या कारकीर्दीत ही देशातली सर्वात मोठी कामगार संघटना बनली.


 राजकीय सन्यास घेत व्यवसायावर लक्ष


दक्षिण आफ्रिकेतल्या घटनात्मक लोकशाहीच्या शिल्पकारांपैकी रामाफोसा एक... मात्र 1994 साली नेल्सन मंडेला सरकारमध्ये उपाध्यक्ष म्हणून निवडून येण्यात त्यांना अपयश आलं. त्यानंतर त्यांनी राजकीय सन्यास घेत व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं. 2012 साली आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे उपाध्यक्ष होत त्यांनी जोरदार राजकीय पुनरागमन केलं. डिसेंबर 2017मध्ये ते पक्षाचे अध्यक्ष झाले आणि आता राष्ट्राध्यक्ष. 


अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं आव्हान


पक्षाचा आणि जनतेचा गाढ विश्वास असला तरी रामाफोसा यांच्या डोक्यावर चढलेला मुकूट काटेरीच आहे... रामाफोसा यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असेल ते देशाच्या घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं.... पक्षात सध्या त्यांना एकमुखी पाठिंबा असला तरी पक्षातले गट-तट एकत्र करण्याचं काम त्यांना करावं लागणार आहे... 
 
रामाफोसा सध्या 65 वर्षांचे आहेत... त्यांनी त्यांची लोकप्रीयता टिकवून ठेवली तर ते दक्षिण आफ्रिकेला उभारी देऊ शकतात, असम मानायला जागा आहे. एकेकाळी वर्णद्वेशानं पोखरलेल्या या देशाला मंडेलांच्या स्वप्नातल्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी रामाफोसा यांच्याइतकं सक्षम सध्यातरी कुणीच दिसत नाही.