रोबोटने फळांचा बॉक्स समजून जिवंत कर्मचाऱ्याला चिरडलं, उचलून कन्व्हेयर बेल्टवर ढकललं अन्...
तंत्रज्ञान विकसित होत असल्याने आता अनेक कंपन्यांमध्ये कामाची गती वाढवण्यासाठी रोबोटचा वापर केला जात आहे. अशाच एका रोबोटने माणसाला बॉक्स समजण्याची चूक करत ठार केल्याची धक्कादाक घटना घडली आहे.
सध्या तंत्रज्ञान इतकं विकसित झालं आहे की, तासभर लागणारं काम आता चुटकीसरशी होत आहे. अनेक कंपन्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने मानवी कामगारांची गरजच संपवली आहे. पण या तंत्रज्ञानासह येणारे धोक्यांकडेही तितकचं लक्ष देण्याची गरज असते. अन्यथा काय होऊ शकतं हे दक्षिण कोरियामधील एका घटनेतून समोर आलं आहे. जिवंत माणूस आणि फळांनी भरलेला बॉक्स यांच्यात गैरसमज झालेल्या इंडस्ट्रियल रोबोटने कामगाराला चिरडून टाकलं. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
रोबोटिक्स कंपनीचे कर्मचारी बुधवारी दक्षिण ग्योंगसांग प्रांतातील कृषी उत्पादनांच्या वितरण केंद्रात रोबोटच्या सेन्सर ऑपरेशन्सची तपासणी करत असताना ही घटना घडली. Yonhap वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रोबोटिक हाताने मिरचीचे बॉक्स उचलून पॅलेट्सवर ठेवले जात होते. यावेळी ते कथितरित्या खराब झाले आणि त्याने बॉक्सऐवजी माणसाला उचलले.
यानंतर रोबोटने कर्मचाऱ्याला कन्व्हेयर बेल्टवर ढकललं. ज्यामुळे त्याचा चेहरा आणि छाती चिरडली गेली. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्याचा मृत्यू झाला. 40 वर्षीय कर्मचारी मिरपूड छाननी प्लांटमध्ये चाचणी घेण्यापूर्वी त्याच्या सेन्सरची तपासणी करत होता. त्याने सुरुवातीला 6 नोव्हेंबर रोजी चाचण्या घेण्याची योजना आखली होती, परंतु रोबोटच्या सेन्सरमध्ये समस्या आल्याने ते 2 दिवस मागे ढकलले गेले.
या प्लांटची मालकी असणाऱ्या Export Agricultural Complex च्या अधिकाऱ्याने या घटनेनंतर सुरक्षित व्यवस्था बसवली जाईल असं म्हटलं आहे. कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीचे रोबोटिक्स तज्ज्ञ क्रिस्टोफर ऍटकेसन यांनी MailOnline ला सांगितलं की, "रोबोटमध्ये मर्यादित संवेदना असते आणि त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे याची मर्यादित जाणीव असते".
याआधी मे महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोरियात एक व्यक्ती रोबोटने ऑटोमोबाईल पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये अ़कवल्याने जखमी झाला होता. अमेरिकन जर्नल ऑफ इंडस्ट्रियल मेडिसिनने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, 1992 ते 2017 या कालावधीत अमेरिकेत औद्योगिक रोबोट्सने किमान 41 लोक मारले आहेत.