कॅनडा : Air India bombing case : Ripudaman Singh shot dead in Canada : एअर इंडिया बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेला रिपुदमन सिंह यांची कॅनडात हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या हत्येचे कारण पुढे आलेले नाही. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथे रिपुदमन सिंह मलिक यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) कामावर जात असताना सरे येथे मलिक याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रिपुदमन सिंह मलिक 1985 च्या एअर इंडिया (एअर इंडिया फ्लाइट 182 'कनिष्क') दहशतवादी बॉम्बस्फोटात निर्दोष सुटले होते. या वृत्ताला दुजोरा देताना मलिकचा मेहुणा जसपाल सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, रिपुदमनची हत्या कोणी केली याची आम्हाला माहिती नाही. त्याची लहान बहीण कॅनडाला जाणार आहे. एअर इंडिया फ्लाइट 182 'कनिष्क' च्या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींपैकी मलिक एक होता.


सरेमध्ये कार धुण्याचे काम करणाऱ्या एका साक्षीदाराने सांगितले की त्याने गुरुवारी सकाळी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि मलिक त्याच्या कारमध्ये बेशुद्ध असल्याचे पाहण्यासाठी बाहेर धावले. तर इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीमने एका निवेदनात म्हटलेय, आम्हाला मलिक यांच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती आहे, तरीही आम्ही त्यांच्या हत्येमागील कारण शोधून काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कोणी गोळीबार केला आणि त्यामागेच कारणाचा शोध घेत आहोत. हल्ल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, गोळीबारात वापरले जाणारे वाहन काही अंतरावर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.


विमान बॉम्बस्फोटात 329 लोकांचा मृत्यू  



23 जून 1985 रोजी, आयर्लंडच्या किनार्‍याजवळ कॅनडाहून आलेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट 182 'कनिष्क' मध्ये बॉम्बस्फोट झाला, ज्यात 329 प्रवासी आणि पायलट यांच्या मृत्यू झाला होता. यामध्ये 280 हून अधिक कॅनेडियन नागरिकांचा समावेश आहे, ज्यात 29 संपूर्ण कुटुंबे आणि 12 वर्षांखालील 86 मुलांचा समावेश होता. रिपुदमन मलिक कथितरित्या पंजाबमधील अनेक दहशतवादी घटनांसाठी जबाबदार असलेल्या बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता आणि एअर इंडिया बॉम्बस्फोटातील कथित सूत्रधार तलविंदर सिंह परमारचा तो जवळचा सहकारी होता. बब्बर खालसा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेवर अमेरिका, कॅनडा आणि भारतासह अनेक देशांनी बंदी घातली आहे.


मलिक आणि त्याचा सहआरोपी अजयब सिंह बागरी यांची 2005 मध्ये सामूहिक हत्या आणि कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मलिकने निर्दोष सुटण्यापूर्वी चार वर्षे तुरुंगात घालवली होती. एअर इंडिया विमान दहशतवादी बॉम्बस्फोट हा कॅनडावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. बहुतेक बळी कॅनेडियन होते आणि कट कॅनडात नियोजित होता.