aww-dorable! प्रिन्स हॅरीसाठी काहीपण, पाहा मेगनचा `हा` अंदाज
मेगन आणि प्रिन्स हॅरिने नव्या अर्थाने कपल गोल्स दिले
मुंबई: ब्रिटनच्या राजघराण्याच्या बऱ्याच चर्चा सहसा पाहायला मिळतात. मग तो शाही विवाहसोहळा असो, राणीचा एखादा महत्त्वाचा निर्णय किंवा तिचं अनोखं स्टाईल स्टेटमेंट असो किंवा चिमुरड्या राजपूत्र आणि राजकन्येविषयीची माहिती असो.
सध्या हे घराणं चर्चेत आहे ते म्हणजे प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळे.
ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया पार्क येथे काही दिवसांपूर्वीच एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान मेगन आणि प्रिन्स हॅरी यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
कार्यक्रम सुरु असतेवेळी त्या ठिकाणी वरुणराजा बरसण्यास सुरुवात झाली. ज्यानंतर प्रिन्स हॅरी आापल्या भाषणातून इतरांना संबोधत असतानाच भर पावसात मेगन त्यांच्यासाठी छत्री धरुन उभी होती.
सोशल मीडियावर याच कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये डचेस ऑफ ससेक्स म्हणजेच मेगनचा हा अंदाज पाहायला मिळाला.
हा व्हिडिओ नेटकऱ्यांची मनं जिंकून गेलाच. पण, त्यासोबतच अनेकांसाठी नव्या अर्थाने कपल गोल्स देऊन गेला. मेगनचा हा अंदाज पाहता खऱ्या अर्थाने पतीनी प्रत्येक पावलावर साथ देत अर्धांगिनी होणं काय असतं हेच जणू तिने सिद्ध केलं.