काबूल: अफगाणिस्तानातून अमेरिकेनं आपलं सैन्य मागे घेताच तालिबान्यांनी अफगाणवर कब्जा मिळवला. एक एक करत संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला. आता तालिबान अफगाणिस्तानात असलेल्या भारताच्या दूतावासातही घुसलं आहे. एकीकडे अफगाणिस्तानातील परिस्थिती भीषण होत आहे. तर दुसरीकडे तालिबानी आता आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी वेगानं पावलं उचलत आहेत. याचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगावर होणार याची कल्पना इतर देशांनाही आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानात असलेल्या भारतीय दूतावासातील कार्यालयाची कुलपं तोडून तालिबानने घुसखोरी केली. तिथल्या वाणिज्य विभागातील दस्तऐवज काढून तपासण्यास सुरुवात केली. भारतीय दूतावासात तालिबाननं घुसखोरी करून तिथले सगळे कागदपत्र काढून तपासायला सुरुवात केली आहे. इतकच नाही तर तिथे असलेल्या गाड्या ते आपल्यासोबत घेऊन गेले.


वरवर जरी तालिबान आम्ही कोणाचं वाकडं करणार नाही किंवा सूड घेणार नाही असं म्हटत असलं तरी तालिबान्यांची कृती मात्र काही वेगळंच सांगत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अहवालात वास्तव समोर आले आहे. अहवालात ताकीद देण्यात आली आहे की तालिबान अमेरिका किंवा त्याच्या नाटो सैन्याला पाठिंबा देणाऱ्यांचा शोध घेत आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार तालिबानने ज्या लोकांना अटक करायची आहे त्यांची एक विशेष यादी तयार केली असून घरोघरी जाऊन त्यांचा शोध घेत आहे. जर हे लोक समोर आले नाहीत तर त्यांच्या कुटुंबियांना गोळ्या घालून ठार करण्यात येईल अशी धमकीच तालिबानने दिली आहे. 


अनेक जण आपला जीव वाचवण्यासाठी अफगाणिस्तानातून पळून जाण्याच्या तयारीत आहेत. तर हळूहळू तालिबानचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर येत आहे. आता तालिबाननं भारतीय दूतावासातही घुसण्य़ाची मजल केली आहे. तिथले कागदपत्र ढुंडाळण्याचा प्रयत्न केला. याशिवाय गाड्याही आपल्यासोबत घेऊन गेले आहेत. एकूणच तिथली परिस्थिती सध्या फार भीषण आहे.