बीजिंग : कोरोना व्हायरसवरून अमेरिका आणि चीनमधला तणाव वाढतच चालला आहे. कोरोनाने केलेल्या नुकसानीमुळे चीनकडून भरभक्कम दंड वसूल करण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. ट्रम्प यांच्या या धमकीला चीनने प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिकेचे नेते सत्याकडे डोळेझाक करत खोटं बोलत आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले. कोरोनाला रोखण्यात अमेरिकेला अपयश आलं आहे. या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे, असा आरोप चीनने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या नेत्यांनी आपल्या अडचणींकडे लक्ष दिलं पाहिजे. कोरोनाचा प्रसार रोखण्याचे प्रयत्न अमेरिकेने केले पाहिजेत, असा सल्लाही चीनने अमेरिकेला दिला आहे.


कोरोना व्हायरसवरून चीनच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. आम्ही त्यांच्याकडून नुकसान भरपाई म्हणून १६२ बिलियन डॉलर (जवळपास १२ लाख कोटी रुपये) वसूल करू, अशी धमकी ट्रम्प यांनी काहीच दिवसांपूर्वी दिली होती. याआधीही ट्रम्प यांनी कोरोनावरुन चीनवर अनेकवेळा निशाणा साधला होता. कोरोना व्हायरसला वुहानमध्येच थांबवता आलं असतं, पण चीनने गांभीर्य दाखवलं नाही, त्यामुळे जगाला या संकटाचा सामना करावा लागत आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला.


अमेरिकेच्या या पवित्र्यानंतर अनेक देश चीनबाबत आक्रमक झाले आहेत. जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या देशांनी कोरोनाबाबात स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.


चहूबाजूंनी टीका होत असतानाही चीन कोरोना त्यांच्या बेजबाबदारपणामुळे जगात पसरला, हे मानायला तयार नाही. उलट कोरोना व्हायरस अमेरिकेच्या सैन्याद्वारे पसरवण्याची शंका असल्याचा आरोप चीनने केला. 


'इतर देश त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत फरक न करता आंतरराष्ट्रीय सहयोग आणि एकमेकांवर विश्वास ठेवून काम करतील,' अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी व्यक्त केली.