Travel Tips : हॉटेलमध्ये राहणार असाल तर आधी पाण्याची बाटली बेडखाली टाका; प्रत्येकानं न विसरता का करावं हे काम?
Travel Tips : प्रवासाला किंवा एखाद्या कारणानं घरापासून दूर राहण्याचा मुद्दा येतो तेव्हातेव्हा हॉटेलमध्ये राहण्याला पसंती दिली जाते. पण, तिथं राहण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं.
Travel Tips : एखाद्या दूरच्या प्रवासासाठी जाण्याचा मुद्दा येतो तेव्हातेव्हा वास्तव्यासाठी अनेक मंडळी एखादं चांगलं हॉटेल निवडतात. रिव्ह्यू पाहून किंवा मग रेटिंग पाहून हे हॉटेल निवडण्यात येतात. पण, प्रत्येक वेळी ही निवड अचूक ठरेलच असं नाही. कारण अनेकदा चांगलं हॉटेल निवडूनही काही अशा गोष्टी घडतात की या निवडीचा पश्चाताप वाटतो. हाच पश्चाताप वाटू नये आणि संकटांमध्ये भर पडू नये यासाठी एका एअर हॉस्टेसनं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या Tips शेअर केल्या आहेत.
एअर हॉस्टेसनं शेअर केलेल्या या टीप्समध्ये तिनं काही अशा गोष्टींवर प्रकाश टाकला आहे, ज्या अतिशय लहान असल्या तरीही त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. न्यूयॉर्क पोस्टनं काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार केएलएम रॉयल डच एयरलाइंसमध्ये सेवेत असणाऱ्या फ्लाईट अटेंडंटनं एक सिक्युरिटी हॅक अर्थात सुरक्षिततेसंदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.
रुममधील पाण्याची बॉटल
एअर हॉस्टेसच्या माहितीनुसार कोणत्याही हॉटेलच्या रुममध्ये सहसा पाण्याची बाटली असते. अशा वेळी रुममध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम ती पाण्याची बाटली बेडखाली टाका. असं केल्यानं बेडखाली कोणीही लपून बसलेलं असल्यास याची माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सावध व्हाल. पाण्याची बाटली फेकल्यामुळं बेसावध असणारी ती व्यक्ती बाहेर येऊ शकते. फक्त पाण्याची बाटलीच नव्हे, तर टॉयलेटरीज, शीतपेयांची बाटली, डबे फेकूनही करू शकता. फेकलेली वस्तू पलिकडून बाहेर न आल्यास काहीतरी चुकीचं घडतंय असं लक्षात घेऊन सावध व्हा.
अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथं एखादी व्यक्ती रुममध्ये आधीपासूनच बेडखाली लपून बसते आणि त्यानंतर त्याच रुममध्ये येणाऱ्यांवर हल्ला करते, चोरी करते. पण, ही लहानशी शक्कल वापरून तुम्ही स्वत:लाच सावध आणि सुरक्षित ठेवू शकता.
हेसुद्धा वाचा : कुरमुरे आरोग्यासाठी फायदेशीर की धोकादायक? जाणूनच घ्या
सोशल मीडियावर व्हायरल होणारी आणखी एक टीप म्हणजे हॉटेलच्या तिजोरी किंवा कपाटासंदर्भातील. अनेकदा हॉटेलच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवलेल्या गोष्टी काही मंडळी विसरतात. त्यामुळं ही बाब टाळण्यासाठी तुमच्या वापरातील चप्पलचे जोड किंवा शूज कपाटात ठेवण्याचा सल्ला काही ट्रॅवल एक्स्पर्टनी दिला आहे. कारण, कुठेही बाहेर पडताना पायात काहीही घातल्याशिवाय निघता येत नाही. अशा वेळी आपोआपच चपला घेण्यासाठी पाय कपाट किंवा तिजोरीकडे वळतात आणि यामुळं तिथं असणाऱ्या सामानाचा विसर पडल्यास ते प्राधान्यानं बॅगेत भरलं जातं. प्रवास करताना अशाच काही टीप आणि ट्रीक अनुभवातून मिळत जातात. तुम्हाला अशी एखादी ट्रॅव्हल टीप माहितीये?