अलिबाबाचे प्रमुख अब्जाधीश जॅक मा २ महिन्यानंतर अचानक आले जगासमोर
अलिबाबा समूहाचे प्रमुख अब्जाधीश जॅक मा बुधवारी अचानक जगासमोर आले.
मुंबई : अलिबाबा समूहाचे प्रमुख अब्जाधीश जॅक मा बुधवारी अचानक जगासमोर आले. ते एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिसले. वृत्तानुसार, ते गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होते. चीनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्स न्यूजचे मुख्य बातमीदार किंगकिंग चेन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'जॅक मा गायब झालेले नाही, हे पहा जॅक मा यांनी बुधवारी सकाळी १०० गावांच्या शिक्षकांसह व्हिडिओ कॉन्फरन्स केली, असे सांगून कोरोना नंतर आपण पुन्हा एकमेकांना भेटू. असं ही त्यांनी म्हटलं.
ग्लोबल टाईम्सच्या पत्रकाराने पुढे सांगितले की, जॅक मा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील 100 ग्रामीण भागातील शिक्षकांशी संवाद साधला. चीनचे अधिकृत माध्यम ग्लोबल टाईम्सनेही याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात जॅक मा संमेलनाला संबोधित करताना दिसत आहेत. जॅक मा सहसा सान्या, हैनान येथील शिक्षकांशी दरवर्षी संवाद साधतात, परंतु कोरोना साथीच्या रोगामुळे या वर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक झाली.
वृत्तानुसार जॅक मा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका मुद्दय़ावरून चिनी सरकारवर टीका केली होती आणि एका भाषणात चीनचे नियामक आणि सरकारी मालकीच्या बँकांवर त्यांचा 'मागासलेपणा' असल्याची टीका केली होती. यानंतर, चीन सरकारने त्यांच्या व्यवसाय साम्राज्यावर आक्रमक भूमिका घेतली. ते रहस्यमयपणे लोकांच्या नजरेतून गायब झाले. रियालिटी टीव्ही शो आफ्रिका बिझिनेस हिरोजच्या हंगामाच्या समाप्तीच्या वेळी मा स्टार जज म्हणून दिसणार होते. हा रिअॅलिटी टीव्ही शो त्यांच्या कंपनीचा आहे. ते कार्यक्रमातून बाहेर पडले आणि त्याचे प्रसारण स्थगित करण्यात आले.