सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी 'अल्फाबेट इंक'चे सीईओ सुंदर पिचाई यांना 2019मध्ये जवळपास 28.1 कोटी डॉलर (2,144.53 कोटी रुपये) वेतन मिळालं. यात वेतन, भत्ता, कंपनीचे शेअर आणि इतर लाभांचा समावेश आहे. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांचा जगातील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. सुंदर पिचाई यांचा जन्म 1972 मध्ये भारतातील चेन्नईमध्ये झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीकडून शेअर बाजारला देण्यात आलेल्या एका अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, सुंदर पिचाई यांच्या पॅकेजमध्ये अधिकतर हिस्सा स्टॉक अवॉर्डचा आहे. त्यापैकी काही अल्फाबेटच्या शेअर्सच्या कामगिरीच्या आधारे दिले जातील.


'अल्फाबेट'ने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी वेतनाच्या रुपात पिचाई यांना 20 लाख डॉलर (15.26 कोटी रुपये) देण्यात येणार आहेत. पिचाई यांचा पगार 'अल्फाबेट'च्या कर्मचार्‍यांच्या सरासरी पगाराच्या 1085 पट आहे.


शुक्रवारी अहवालातून सांगण्यात आलं की, सुंदर पिचाई यांची 'अल्फाबेट'मध्ये सीईओपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या पगारात इतकी वाढ झाली आहे. त्यांच्या बेसिक पगारात वाढ करण्याव्यतिरिक्त, पिचाई यांना दोन स्टॉक पॅकेजची ऑफर देण्यात आली.


पिचाई यांनी आयआयटी खडगपूरहून बॅचलर डिग्री पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमधून एमएसची डिग्री घेतली. त्यानंतर वॉर्टन यूनिव्हर्सिटीमधून एमबीए केलं. 2004मध्ये ते प्रोडक्ट आणि इनोव्हेशन ऑफिसर म्हणून गूगलशी जोडले गेले होते.