कॅलिफोर्नियात विमानातून भातपेरणी, जाणून घ्या
कॅलिफोर्नियात चक्क विमानातून भात पेरणी केली जाते.
ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, कॅलिफोर्निया : तुम्ही कोकणातली भात पेरणी आणि लावणी पाहिली असेल. पेरणी आणि लावणीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं. एवढं करून शेतकऱ्याला खूप फायदा होईल एवढं पिकतंच नाही. हे झालं भारतातलं...सातासमुद्रापार अमेरिकेत मात्र उलटच आहे. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात भात पिकतो. पण तिथंली शेती जगावेगळीच आहे बरं का? कॅलिफोर्नियात चक्क विमानातून भात पेरणी केली जाते.
तिथं शेतीचा आकारही मोठा आहे. एका शेतकऱ्याकडं शंभर ते दीडशे एकर जमीन आहे. आता एवढ्या जमिनीवर पेरणी करायची म्हटल्यावर विमानाचीच गरज लागणार ना? कॅलिफोर्नियात हवाई पेरणी करण्यासाठी खास विमान आहे. या विमानात पेरणीसाठीचा भात भरण्यासाठी एक कप्पा आहे. या कप्प्यात भात भरल्यानंतर शेतकरी विमानासह हवेत झेपावतो. विमानात लावलेल्या विशेष सेन्सरच्या मदतीनं तो पेरणी करतो.
या सेन्सरच्या हिरव्या लाईट पेटल्यानंतर तो बियाणं खाली सोडतो. लाल दिवे पेटल्यावर तो बियाणं खाली सोडण्याचं बटन बंद करतो. त्याची ही हवाई पेरणी एवढी अचूक असते की फारच अपवादात्मक स्थितीत शेताच्या बांधावर बियाणं पडतं. आता हे झालं पेरणीचं... जेव्हा भात कापणीला येतो. तेव्हाही तिथला शेतकरी एक अजस्त्र मशीन शेतात आणून उभं करतो. हे मशीन फक्त एकच माणूस ऑपरेट करू शकतो.
ही मशीन भात कापत नेते. मशीनच्या मागील बाजुला धान्य बाहेर पडतं. हे धान्य एका ट्रॉलित टाकता येऊ शकतं. त्यामुळं मजूर आणा त्यांच्यासोबत दिवसभर शेतात काम करा ही डोकेदुखीच तिथल्या शेतकऱ्यांना नाही. झटपट हवाई पेरणी भात पिकल्यानंतर झटपट कापणी आणि मळणीसुद्धा अशी गंमतीदार शेती असते.