वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) अमेरिकेत वाढती बेरोजगारी लक्षात घेता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एच -१ बीसह परदेशी कामाच्या व्हिसावर बंदी घातली आहे. या वर्षाच्या अखेरीस हे निर्बंध कायम राहतील. अमेरिकन सरकारच्या या निर्णयामुळे भारतीयांचे सर्वाधिक नुकसान होईल. कारण भारतीय आयटी व्यावसायिकांमध्ये H-1B व्हिसा खूप लोकप्रिय आहे. आपला निर्णय योग्य असल्याचे सांगत, ट्रम्प म्हणाले की कोविड-१९ च्या उद्रेकामुळे नोकरी गमावलेल्या कोट्यवधी अमेरिकन लोकांना मदत होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यावसायिक संघटना, कायदेशीर आणि मानवाधिकार संस्था यांच्या विरोधाला न जुमानता ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम अनेक अमेरिकन आणि भारतीय कंपन्यांवर होईल. विशेषत: भारतीय आयटी व्यावसायिकांना, ज्यांना १ ऑक्टोबरपासून २०२१ च्या आर्थिक वर्षासाठी H-1B व्हिसा देण्यात आला होता.



या संदर्भात अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, अमेरिकेच्या श्रम बाजारावरील परदेशी कामगारांच्या प्रभावाची आपण दखल घेणे आवश्यक आहे. विशेषत: जेव्हा सध्याच्या असाधारण परिस्थितीमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे आणि कामगारांची मागणी कमी झाली आहे. ते पुढे म्हणाले की, अमेरिकेतील एकूण बेरोजगारीच्या दरात फेब्रुवारी ते मे दरम्यान चार पट वाढ झाली आहे. आपल्या लोकांना अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात नोकरीसाठी परदेशी नागरिकांशी स्पर्धा करावी लागेल. काही लोक असेही आहेत जे तात्पुरत्या कामासाठी अमेरिकेत येतात. हे लोक आपले जीवनसाथी किंवा मुले देखील घेऊन येतात, जे नंतर अमेरिकन लोकांसाठी स्पर्धा निर्माण करतात.


कोणत्याही नवीन एच१ बी व्हिसाधारकाला अमेरिकेत नोकरी करता येणार नाही. व्हिसा निलंबन करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतरच व्हिसाधारकांना नोकरी करता येणार आहे. एच१बी व्हिसा हा अमेरिकेतील कंपन्यांना परदेशातील नागरिकांना नोकरी करण्यास मान्यता देतो. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे याचा मोठा आणि सर्वाधिक फटका हा भारतीयांना बसणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय असल्याचे बोलले जात आहे.