बिजींग : चीनमध्ये उइगर मुस्लिमांना 'देशभक्त' आणि 'निष्ठावंत' बनवण्यासाठी सरकारनं विशेष प्रशिक्षण कॅम्प उघडले आहेत. या कॅम्पमध्ये मुस्लिमांना चीनचं सरकार आणि तिथल्या कम्युनिस्ट पक्षाप्रती निष्ठावान बनवण्याचे धडे दिले जात आहेत. या कॅम्पमध्ये मुस्लिमांना जबरदस्ती पकडून आणण्यात येतंय आणि २ महिने डांबून ठेवण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. या कॅम्पमध्ये मुस्लिमांना चीनी भाषा शिकवण्यात येतेय, कायद्याचा अभ्यास आणि रोजगारासाठीचं प्रशिक्षण देण्यात येतंय, असं चीनमधल्या सरकारनं सांगितलं आहे. असं असलं तरी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थांनी मात्र यावर आक्षेप घेतले आहेत. चीनचं सरकार उइगर मुस्लिमांची सांस्कृतिक ओळख पुसण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्यावर अत्याचार करतायत असा आरोप मानवाधिकार संस्थांनी केला आहे.


इस्लामिक देशांचं मौन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातल्या मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचं बोलणाऱ्या पाकिस्ताननं मात्र सीमेच्या बाजूलाच असलेल्या चीनबद्दल मात्र मौन बाळगलं आहे. इतर मुस्लिम देशांनीही याबाबत अजून कोणताही विरोध केलेला नाही. पण पश्चिमेकडच्या मानवाधिकार संघटना याविरोधात आवाज उठवायला लागल्या आहेत. रविवारी अमेरिकेचं प्रमुख वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सनं या मुद्द्यावर पहिल्या पानावर फोटो आणि बातमी प्रकाशित केली आहे.



काय होतंय कॅम्पमध्ये?


न्यूयॉर्क टाईम्सनं एका मोठ्या इमारतीचा फोटो छापला आहे. या इमारतीमध्ये मुस्लिमांना 'देशभक्त' आणि 'निष्ठावंत' बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येतंय. या इमारतीमध्ये अनेक तास मुस्लिमांचे क्लास घेऊन चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या समर्थनाचे धडे शिकवले जातायत. एवढच नाही तर मुस्लिमांना आपल्याच संस्कृतीवर टीका करायलाही सांगितलं जातंय. न्यूयॉर्क टाईम्सच्या या रिपोर्टनुसार या प्रशिक्षणाचं उद्दीष्ट मुस्लिमांना धर्मासाठी असलेली निष्ठा संपवणं आणि चीनसाठी निष्ठावंत होणं असल्याचं सांगितलं जातंय.


चीनमध्ये जवळपास २.३ कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. यातले जवळपास १ कोटी उइगर मुस्लिम शिनजियांग प्रांतात राहतात. उइगर मुस्लिमांच्या कट्टरतावादामुळे त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर चीन सरकारनं अंकुश लावला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्टनुसार १० लाख उइगर मुस्लिमांना त्यांच्याच शहरात नजरबंद करण्यात आलंय.



साम्यवादाचे धडे


चीन सरकारच्या या प्रशिक्षण कॅम्पमध्ये बाहेरच्या व्यक्तीला जायला परवानगी नाही. या कॅम्पमध्ये उइगर मुस्लिमांना जबरदस्ती साम्यवादी साहित्य शिकण्यासाठी मजबूर केलं जातंय. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं कौतुक करणारी लेक्चर दिली जात असल्याचा आरोप कॅम्पमधून बाहेर पडलेल्या मुस्लिमांनी केला आहे.


न्यूयॉर्क टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार या कॅम्पमधून बाहेर पडलेल्या ४१ वर्षांच्या अब्दुसलाम मुहमेत यांनी कॅम्पमध्ये काय होतं याची माहिती दिली. मी कुराण वाचत असताना पोलिसांनी मला अटक केली. जवळपास दोन महिने या कॅम्पमध्ये राहिल्यावर मला सोडण्यात आलं. अशा कॅम्पच्या माध्यमातून  कट्टरतावाद संपवता येणार नाही तर वाढेल, असं अब्दुसलाम यांनी न्यूयॉर्क टाईम्सला सांगितलं.