रांची : पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात १०० वर्षांहून अधिक जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला झाला आहे. या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील पुराना किला भागात शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता दहा ते पंधरा जणांच्या टोळीने मंदिरावर हल्ला केला. मुख्य गेट आणि वरच्या मजल्यावरील दुसर्‍या दरवाजाच्या पायऱ्या तोडल्या. 'डॉन' वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इव्हॅक्यूए ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ETPB) उत्तर विभाग सुरक्षा अधिकारी सय्यद रजा अब्बास जैदी यांनी रावळपिंडीतील बन्नी पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल केलाय. गेल्या एक महिन्यापासून मंदिराचे बांधकाम आणि नूतनीकरणाचे काम सुरू होते असे तक्रारीत म्हटले आहे. मंदिरासमोर काही अतिक्रमणे होती. ते 24 मार्च रोजी हटविण्यात आले. मंदिरात धार्मिक विधी सुरु झाले नव्हते आणि पुजेसाठी कोणती मुर्ती देखील ठेवली नव्हती.



सुरक्षा अधिकारी सय्यद रजा अब्बास जैदी यांनी मंदिराला नुकसान पोहोचवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी अतिक्रमण करणाऱ्यांनी मंदिराच्या भोवताली दुकाने बनवून ताबा मिळविला होता. जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविली. मंदिराजवळील अतिक्रमण हटवल्यानंतर नूतनीकरणाचे काम सुरू झाले होते.


मंदिराचे प्रशासक ओम प्रकाश यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. माहिती मिळताच रावळपिंडीचे पोलिस कर्मचारी तेथे पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. 'द एक्स्प्रेस ट्रिब्यून' च्या वृत्तानुसार मंदिर आणि प्रकाश यांच्या घराबाहेर पोलीस तैनात आहेत. मंदिरात होळी साजरी केली जाणार नाही असे प्रकाश यांनी सांगितले.