ऑस्ट्रेलियात १० हजार उंटांना गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश
प्रशासनानं आजपासून पाच दिवसांचं अभियान सुरू केलंय
सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून वणव्याची भीषण आग पसरलीय. त्यामुळे श्वास गुदरमरणारं वातावरण आणि पाणी संकट भीषण बनलंय. त्यामुळेच स्थानिक प्रशासनानं १० हजार उंटांना गोळ्या घालून ठार करण्याचा निर्णय घेतलाय. प्रशासनाच्या मते, जंगलात लागलेल्या आगीमुळे उंट जंगल सोडून रहिवासी भागांत दाखल होत आहेत. आगीमुळे पसरलेल्या गरम वातावरणामुळे हे उंट जास्त पाणी पित आहेत. अगोदरपासूनच पाण्याच्या समस्येनं इथले नागरिक त्रस्त असल्यानं मोठी समस्या उभी ठाकलीय.
यामुळेच प्रशासनानं आजपासून पाच दिवसांचं अभियान सुरू केलंय. या मोहिमेसाठी हेलिकॉफ्टर्सचा वापर केला जाणार आहे. ज्या भागांत ही मोहीम राबवली जाणार आहे त्या भागांत ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमाती राहतात. हा भाग दक्षिण ऑस्ट्रेलयाच्या रिमोट उत्तर - पश्चिम क्षेत्रात येतात. या प्रकरणात स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आगीमुळे आम्ही इथे गरम आणि कठिण परिस्थितीचा सामना करत आहे.
'आम्ही अगोदरपासूनच आपल्या घरांत फसलेले आहोत. जलसंकटामुळे लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एसीमधून निघणारं पाणीही साठवून ठेवत आहेत. उंटांना पाणी मिळालं नाही तर ते एसीमधून निघणारं पाणीही पीत आहेत. ही विषम परिस्थिती पाहता हा निर्णय घेतला गेलाय', असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.
वणव्याच्या आगीत जंगलात लागलेल्या आगीच्या कारणामुळे १२ हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. तर जवळपास पाच करोड जीव-जंतुंना विस्थापित व्हावं लागलंय किंवा आगीनं त्यांचा बळी घेतलाय.