शेवटच्या क्षणी जीवाची भीक मागत होता बगदादी
जगातील सर्वाधिक क्रूर दहशतवादी बगदादी ठार
नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक क्रूर दहशतवादी, आयसीसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीला ठार मारण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच अमेरिकेनं चढवलेल्या हल्ल्यात बगदादी ठार झाल्याची घोषणा केली आहे. सीरियात लपून बसलेल्या बगदादीला बंकरमधून पळून जात असताना ठार मारण्यात आलं.
आयसीसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीला ठार मारण्यात अमेरिकेला यश आलं आहे. सीरियातील बंकरमध्ये लपून बसलेल्या बगदादीवर अमेरिकेनं सैन्याकडून हल्ले चढवले गेले. हल्ले चढवले जात असताना बंकरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना बगदादी मारला गेला. या हल्ल्यात बगदादीची तीन मुलंही ठार झाली असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.
सीरियातील उत्तरेकडील इडलीब इथल्या कारवाईत बगदादी मारला गेला. ज्यानं आतापर्यंत अनेकांना अतिशय क्रूररित्या मारलं तो आपल्या जीवनाच्या अखेरच्या क्षणी अक्षरश: रडत होता आणि जीवाच्या आकांतानं ओरडत होता. स्फोटांनी भरलेलं जॅकेट घालून तो बंकरमध्ये लपून बसला होता. अमेरिकन सैन्याच्या श्वानांनी बगदादीचा मागमूस शोधून काढला. ज्या बंकरमध्ये बगदादी लपून बसला होता. त्या बंकरला अमेरिकन सैन्यानं घेराव घातला.
या बंकरमध्ये अमेरिकेची श्वानपथकं त्याचा पाठलाग करत होती आणि बगदादी अगदी जीव मुठीत घेऊन धावत होता. अखेर धावता-धावता बंकर संपला आणि आपला मृत्यू समोर दिसताच बगदादीनं आपलं स्फोटांनी भरलेल्या जॅकेटनं स्वत:सह आपल्या तीन मुलांना उठवून दिलं. यात तो ठार झाला.
बगदादी हा जगातील सर्वाधिक क्रूर दहशतवादी होता. बगदादी हा आयसीसचा म्होरक्या होता. इराकमध्ये इस्लामिक स्टेटची स्थापना त्यानं केली होती. बगदादीवर २५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस देखील ठेवण्यात आलं होतं.
गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या मृत्यूच्या बातम्या येत राहिल्या. मात्र तो जिवंत होता. त्याला अखेर जगातील सर्वाधिक शक्तिशाली देशानं यमसदनी धाडत एका क्रूरकर्म्याचा आणि एकप्रकारे जगात हिंसा पसरवणाऱ्यांचाही अंत केला आहे.