Bangladesh Crisis : बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना अजूनही भारतात असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख हसीना (Sheikh Hasina) परत बांग्लादेशात जाणार नाहीत. काल संध्याकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हसीना यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बांगलादेशमधली स्थिती जाणून घेतल्या.  त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेट कौन्सिल ऑफ सिक्युरिटीची बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सितारमन यासह ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, बांग्लादेशात अंतरिम सरकार बनवणार असल्याची घोषणा लष्कराकडून करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले
बांग्लादेशात हिंसक आंदोलकांनी आता हिंदूना (Hindus) लक्ष्य केलंय. हिंदूंची घरं आणि मंदिरांची तोडफोड केली जातेय. बांग्लादेशातील नंदीपार बोरो बट ताला भागात आंदोलकांनी हिंदूच्या घरावर हल्ला केला. घरातील साहित्याचं तोडफोड करून पैसे आणि दागिण्याची लूट करण्यात आलीय. यात आमचा काय गुन्हा आहे, अशी विचारणा हिंदू महिला आंदोलकांना करताना दिसतेय. हिंसक आंदोलकांनी इस्कॉन मंदिराचीही तोडफोड केलीय.  दरम्यान, भारताने बांग्लादेशातील भारतीय नागरिकांना सुरक्षास्थळी राहण्याच्या सूचना केल्यात. 


विरोधकांची सहकार्याची भूमिका
बांग्लादेश संदर्भात दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी वेगळी भूमिका घेतली. बांगलादेश बाबत विरोधी पक्ष सरकारला सहकार्य करणार असल्याचं आश्वासन विरोधकांनी दिलंय. बांगलादेश बाबत लॉंग टर्म स्ट्रटेजी असायला हवी असं मत राहुल गांधींनी या बैठकीत व्यक्त केलं. दरम्यान भारत-बांग्लादेश सीमेवर सध्या तणावाची परिस्थिती असली तरी चिंता करण्याचे कारण नाही असं ते यावेळी म्हणालेत.


आरक्षणावरुन बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलन
बांगलादेशात आरक्षणासाठी उभारण्यात आलेलं आंदोलन हिंसक झालंय.  या आंदोलनात सुमारे 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी जीव गमावलाय. आरक्षणाच्या विरोधातून सुरू झालेल्या आंदोलनाचा प्रवास सत्ता बदलापर्यंत झालाय. शेख हसिना यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होत भारतात पोहचल्या.  बांगलादेशात लष्कराच्या अधिपत्याखाली आता नवीन सरकार स्थापण्याची तयारी सुरू आहे.  लष्करप्रमुख  जनरल वकार-उज़-ज़मान यांच्या इशाऱ्यावरच नव्या सरकारचा कारभार चालणार आहे. 


दरम्यान, पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन बांगलादेश सोडलेल्या शेख हसीना यांना देश सोडण्यासाठी अवघी 45 मिनिटं दिली गेली होती. त्यानंतर शेख हसीना भारतात आल्या. सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमाराला त्यांचं विमान हिंडन एअरबेसवर उतरलं. भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी शेख हसीना यांचं स्वागत केलं.