पंतप्रधान मोदींनी भूतानमध्येही भारताचं RuPay कार्ड केलं लॉन्च
भूतानमधल्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शेमतोखा झोंग या प्रासादालाही त्यांनी भेट दिली
थिम्पू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भूतानची राजधानी थिम्पूमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. विमानतळावर भूतानचे पंतप्रधान लोताय शेरिंग मोदींच्या स्वागताला हजर होते. तिथं त्यांना लष्करानं मानवंदना दिली. त्यानंतर ताशिचोधोंग पॅलेसमध्येही त्यांनी मानवंदनेचा स्वीकार केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूटानमध्येही RuPay कार्डाचं उद्घाटन केलं. नोटबंदीच्या वेळी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याच्या उद्देशानं भारतानं आपलं हे कार्ड लॉन्च केलं होतं. आता भूतानमधल्या नागरिकांच्या वापरासाठी हे वापरण्यात येणार आहे.
यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि भूतानचे पंतप्रधान Plaque of the Ground Station for South Asian Satellite प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. दोन्ही नेत्यांनी मिळून भारत-भूटान हायड्रोपावर को-ऑपरेशनचे पाच दशक पूर्ण होण्याच्या निमित्तानं एक स्टॅम्प प्रदर्शित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर लगेचच भूतान दौरा केला होता.
भूतानमधल्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शेमतोखा झोंग या प्रासादालाही त्यांनी भेट दिली. १६२९ मध्ये बांधण्यात आलेल्या या बौद्ध मठाचं नुकतंच नुतनीकरण करण्यात आलंय.
यावेळी मोदी आणि शेरिंग यांच्यामध्ये दोन्ही राष्ट्रांचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत द्विपक्षीय चर्चा झाली. भूतानसारखा मित्र आणि शेजारी असणं कुणाला आवडणार नाही, असं यावेळी पंतप्रधान म्हणाले. तर भूतान आणि भारताच्या आकारात मोठा फरक असला तरी दोन्ही देशांची मूल्यं आणि धारणा समान असल्याचं शेरिंग यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या भूतानच्या दौऱ्यावर आहेत.