प्रसिद्ध उद्योगपती आणि एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे बिल गेट्स यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून, तो पाहिल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत. याचं कारण व्हिडीओत बिल गेट्स चक्क गटारात उतरताना दिसत आहेत. बिल गेट्स यांनी आपल्या इंस्टाग्रामला हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ दिसत आहे त्यानुसार बिल गेट्स ब्रसेल्स येथील सीव्हर सिस्टम (भूमीगत गटारांची यंत्रणा) कशाप्रकारे काम करते याची माहिती घेण्यासाठी आतमध्ये जातात. आत आल्यानंतर ते तेथेली सीव्हर म्युझिअम पाहतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील पाण्याचा निचरा कशाप्रकारे केला जातो हे समजण्यासाठी बिल गेट्स वैज्ञानिकांशी चर्चा करताना दिसत आहेत. सीव्हर आणि ट्रीटमेंट प्लांट्सचं 200 मैल हे नेटवर्क शहरातील कचरा व्यवस्थापनाचं काम करतं. 


बिल गेट्स वर्ल्ड टॉयलेट डेच्या निमित्ताने गटारात उतरले होते. त्यांनी इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, "यावर्षी जागतिक शौचालय दिनानिमित्त, मी ब्रसेल्सच्या सांडपाणी प्रणालीचा लपलेला इतिहास आणि जागतिक आरोग्यामध्ये सांडपाण्याची भूमिका काय आहे याचा मागोवा घेतला".



या व्हिडीओत स्क्रीनवर शब्दांमध्ये लिहिलं आहे की, "मी ब्रसेल्सच्या अंडरवॉटर म्युझिअममध्ये हा सर्व अनुभव घेतला. शहराच्या सांडपाणी प्रणालीचा इतिहास समजून घेतला. 1800 च्या दशकात सांडपाणी शहराच्या सेने नदीत सोडलं जात असे. यामुळे भयानक हैजा नावाचा आजार पसरला होता. आज सीव्हर आणि ट्रीटमेंट प्लांटचं 200 मैलांचं नेटवर्क शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करत आहे".


बिल गेट्स नेहमीच स्वच्छताच्या मुद्द्यांवर लोकांमध्ये जागरुकता निर्माण करताना दिसत असतात. त्यांनी 2015 मध्ये शौचालयासाठी वापरलं जाणारं पाणी पिण्यायोग्य बनवण्यासंबंधी जाणून घेतलं होतं. त्यांनी हे पाणी पिऊनही दाखवलं होतं. 2016 मध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये ते खड्डा असणाऱ्या शौचालयाजवल उभे होते. त्यावेळी त्यांनी लिहिलं होतं की, फार दुर्गंधी होती आणि मला फार भीती वाटत होती. बिल गेट्स आपल्या आणि पूर्वाश्रमीची पत्नीच्या बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक जागतिक मुद्द्यांवर भाष्य करत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असतात.