Elon Musk उमेदवाराला विचारतात `हा` एक प्रश्न; डिग्री नसलेल्यांनाही देतात नोकरी
Elon Musk Asks One Question In Hiring Interviews: एलॉन मस्क हे जगातील सर्वात नामवंत अशा ट्विटर, स्पेस एक्स, टेस्ला या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असण्याबरोबरच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.
Elon Musk One Question In Hiring Interviews: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश असलेले उद्योजक एलॉन मस्क (Elon Musk) हे मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. पहिल्यांदा ट्वीटर कंपनी विकत घेण्याचा निर्णय, त्यानंतरचा घुमजाव आणि अखेर कंपनी खरेदीचा निर्णय यामुळे ते चर्चेत होते. त्यानंतर ट्विटरमधून मोठ्या प्रमाणात कर्मचारीकपात केल्याने मस्क टिकेच्या केंद्रस्थानी आहेत. मात्र याचदरम्यान मस्क यांनी कंपनीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीवर घेताना ते कोणती पद्धत वापरतात यासंदर्भातील खुलासा केला आहे.
शिक्षणाची आणि डिग्रीची आवश्यकता नाही
मस्क हे ट्विटरबरोबरच टेस्ला आणि स्पेस एक्स या कंपन्यांचेही मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ आहेत. आपण एखाद्याला नोकरी देताना त्याची शैक्षिणिक पात्रता किती आहे हे पाहत नाही असं मस्क सांगतात. "कॉलेजच्या डिग्रीचीही गरज मला वाटत नाही. अगदी उच्च शिक्षित असणंही मला योग्य वाटत नाही," असं मस्क यांनी एका मुलाखतीमध्ये कर्मचाऱ्यासंदर्भातील अपेक्षांबद्दल भाष्य करताना सांगितलेलं.
नोकरी देताना त्या व्यक्तीमध्ये मस्क शोधतात ही गोष्ट
आपण नोकरी देण्यासंदर्भात एखाद्या व्यक्तीचा विचार करतो तेव्हा त्याच्याकडे 'अपवादात्मक क्षमता आहे का' यासंदर्भातील चाचपणी करतो असं मस्क म्हणाले. "जर त्या व्यक्तीने यापूर्वी अनेकदा अपवादात्मक कामगिरी केल्याचं दिसत असेल तर त्याच्याबद्दल मी भविष्यात विचार करेल," असं मस्क यांनी सांगितलं. आपल्या उपलब्धीसंदर्भात उमेदवार खरोखर प्रामाणिक आहे की नाही याबद्दलची चाचपणी करण्याची मस्क यांनी स्वत:ची एक खास पद्धत आहे. मस्क यांनी आपण उमेदवाराला एकाच प्रश्न मुलाखतीत विचारतो असं सांगितलं.
विचारतात हा एक प्रश्न
"तुम्ही सोडवलेल्या सर्वात जटील समस्या कोणत्या आणि तुम्ही त्या कशा सोडवल्या हे मला सांगू शकता का?" असा प्रश्न मस्क उमेदवाराला विचारतात. "ज्यांनी खरोखर एखाद्या मोठ्या समस्येवर काम केलं असेल आणि ती सोडवली असेल त्यांना पूर्ण पद्धत ठाऊक असते. ते याबद्दल सविस्तरपणे माहिती सांगू शकतात," असा अनुभव मस्क यांनी सांगितला.
ज्यांनी अडचणींचा सामना केलेला असतो त्यांना...
"अर्थात त्या उमेदवाराने काही महत्त्वाचं काम केलं आहे की नाही हे ही तुम्ही पाहता. त्यांच्यावर पूर्वी कोणती जबाबदारी होती की त्यांच्यावर असणाऱ्या वरिष्ठ व्यक्तीकडे ती जबाबदारी होती? अनेकदा ज्यांनी अशा कठीण प्रसंगांना तोंड दिलेलं असतं त्यांना त्यामधून मार्ग कसा काढला हे अगदी सविस्तरपणे सांगता येतं," असंही मस्क म्हणाले. तसेच एखादी व्यक्ती खोटे दावे करत असेल तर तिला या गोष्टी सविस्तरपणे उलगडून सांगता येत नाहीत. त्यामुळेच कोणती समस्या सोडवली आणि कशी हे उमेदवाराकडूनच ऐकून घेण्यास मस्क प्राधान्य देतात.