नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दलित संघटना मोदी सरकार विरोधात बोलत आहे. २ एप्रिलला भारत बंद दरम्यान दलितांचं आंदोलन असो की मग भाजपमधील दलित नेत्यांनी दर्शलवलेली नाराजी असो. मोदी सरकारला याचा फटका बसण्याची चिन्हं असतांना आता मोदी सरकार ही नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. १४ एप्रिलला भाजप आणि आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.


देशाबाहेर साजरी होणार जयंती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप देशाबाहेर देखील जयंती साजरी करणार आहे. लंडनमध्ये आंबेडकर जयंती साजरी होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लंडनमधील या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी 18 ते २० एप्रिल दरम्यान लंडनमध्ये राहणार आहेत. या दरम्यान लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात सहभागी होतील.


आंतरराष्ट्रीय स्मारक


नोव्हेंबर २०१५ मध्ये डॉ. आंबेडकर यांचं लंडनमधील १०, किंग हेनरी रोड येथील घर सरकारने खरेदी केलं होतं. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये अध्ययानादरम्यान डॉ. आंबेडकर १९२१-१९२२ मध्ये याच घरात राहिले होते. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत हे घर सरकाने विकत घेतलं होतं. महाराष्ट्राच्या भाजप सरकारने या घरासाठी निधी दिला होता. त्यानंतर २०५० फुटाचं हे घर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं होतं. शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्राच्या रूपात याला विकसित केलं जात आहे.