ढाका: बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांना धराशाही करत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या शेख हसीना यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी आपल्या विरोधकांची खिल्ली उडवताना भाजप आणि काँग्रेस पक्षाचे उदाहरण दिले. यावेळी त्यांनी विरोधकांना टोमणावजा सल्ला दिला. विरोधकांनी भारताकडे पाहावे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या? निवडणूक होईपर्यंत त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करता आला नाही. भारतामधील एवढा जुना पक्ष असूनही त्यांना स्वत:चा नेता निवडता आला नाही. त्यामुळेच जनतेने काँग्रेसला नाकारले. याउलट भाजपकडे पाहा. राजीव गांधी यांच्या काळात भाजपचे अवघे दोन खासदार जिंकून आले होते. मात्र, आज तोच पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे विरोधकांनी चांगले काम केल्यास एक दिवस ते सत्तेत येतील, असे उपरोधिक वक्तव्य शेख हसीना यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेख हसिना यांच्या अवामी लीगप्रणित आघाडीने २८८ जागांवर विजय मिळवला. तर बांगलादेश राष्ट्रवादी पक्षाच्या (बीएनपी) नेतृत्वाखाली एकटवलेल्या विरोधकांना अवघ्या सात जागांवर विजय मिळाला. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून शेख हसीना यांनी आपल्या अनेक विरोधकांना तुरुंगात डांबले होते. यामुळे देशभरात अंतर्गत धुसफूस निर्माण झाली होती. निवडणुकीच्या काळात झालेल्या हिंसाचारात देशभरात १७ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत विरोधक शेख हसीना यांना कडवी टक्कर देतील, अशी आशा होती. मात्र, ती सपशेल फोल ठरली.


दरम्यान, शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणे भारतासाठी अनुकूल मानले जात आहे. अवामी लीग पक्षाचे भारताशी नेहमी सौहार्दाचे संबंध राहिले आहेत.