जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदांवर बॉम्ब हल्ला; हल्लेखोराला पोलिसांकडून अटक
Bomb Attack : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत स्फोट झाला आहे.फुमियो किशिदा भाषण देत असताना त्याचवेळी बॉम्ब हल्ला झाला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांना सुखरूप बाहेर काढले आहे.
Bomb Attack on Japan PM : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. वाकायामा शहरातील भाषणादरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर बॉम्ब (Bomb Attack) फेकल्याचे वृत्त आहे. मात्र, बॉम्बचा स्फोट होईपर्यंत पंतप्रधान किशिदा यांना सुखरूप बाजूला नेण्यात आले होते. ज्या ठिकाणी भाषण होणार होते तेथून किशिदा यांना घेऊन जात असतानाच मोठा आवाज झाला.
फुमियो किशिदा यांच्या भाषणादरम्यान हा स्फोट झाला. घटनास्थळी स्फोटाचा ऐकू आल्यानंतर पंतप्रधान फुमियो किशिदा यांना शनिवारी वाकायामा येथून बाहेर काढण्यात आले. जपानी वृत्तसेवा जीजीच्या वृत्तानुसार, 15 एप्रिल रोजी वाकायामा शहरातील मैदानी भाषणादरम्यान पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याजवळ पाईप सारखी वस्तू फेकण्यात आली होती. दरम्यान, या घटनेच्या वर्षभरापूर्वी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरही बैठकीदरम्यान गोळी झाडण्यात आली होती ज्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
द जपान टाईम्सच्या वृत्तानुसार, वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा भाषण देणार होते. त्याआधीच हा स्फोट झाला. स्मोक बॉम्ब फेकल्यानंतर आजूबाजूला धुराचे लोट पसरले होते. या स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या लोकांची स्फोटानंतर धावपळ सुरु झाली. याच दरम्यान, सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला पकडल्याचे समोर आले. सभेत झालेल्या स्फोटानंतर पंतप्रधान किशिदा थोडक्यात बचावले. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ ते भाषण करणार होते मात्र त्याआधीच हा स्फोट झाला.
दरम्यान, इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तींच्या सुरक्षेत सातत्याने हलगर्जीपणा का होतो याबाबत वारंवार शंका निर्माण होत आहे. मात्र जपानमधील पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था भारताच्या पंतप्रधानांसारखी नाही. जपानमध्ये खूप कडक कायदे आहेत. तिथे परदेशी लोक फार कमी आहेत. त्यामुळे सुरक्षेची इतकी गरज नाही. मात्र शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी त्याबाबत आढावा घेत सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे ठरवले होते. मात्र पुन्हा एकदा पंतप्रधान किशिदा यांच्यावर हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच येत्या काळात जपानच्या हिरोशिमा शहरात G7 परिषद होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा आढावा घेण्याची वेळ आली आहे.