लंडन: संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे आता बोरीस जॉन्सन यांच्याकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. थेरेसा मे यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठीची निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत बोरीस जॉन्सन यांनी जेरमी हंट यांचा पराभव केल्याचे समजते. त्यामुळे बोरीस जॉन्सन हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील. त्यांच्यासमोर आता ब्रेग्झिटचा तिढा सोडवण्याचे मोठे आव्हान असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी आणि सत्तारूढ हुजूर पक्षाच्या नेतेपदासाठी सोमवारी निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी पक्षाच्या १ लाख ६० हजार कार्यकर्त्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. मतदान प्रक्रियेदरम्यान, जॉन्सन हे आघाडीवर होते. ब्रिटनच्या संविधानानुसार बहुमत असलेल्या पक्षाचा नेताच पंतप्रधानपदी विराजमान होतो. 


निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना बोरीस जॉन्सन यांनी म्हटले की, मी ब्रेक्झिटचा तिढा नक्की सोडवेन आणि देशाला अखंड ठेवेन. तसेच आगामी निवडणुकीत आम्ही मजूर पक्षाचाही पराभव करू, असा दावा जॉन्सन यांनी केला. 


बोरीस जॉन्सन बुधवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. ५५ वर्षांच्या बोरीस जॉन्सन यांची महत्त्वाकांक्षी पण बेभरवशाचा राजकीय नेता अशी ओळख आहे. त्यांच्याकडे आतापर्यंत प्रशासनातील अनेक महत्त्वांच्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे.


ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळाल्याने ब्रेक्झिटमुळे ब्रिटनमध्ये निर्माण झालेली अस्थिरता संपण्याची चिन्हे आहेत. 



या निकालानंतर थेरेसा मे 'हाउस ऑफ कॉमन्स'ला संबोधित करतील आणि त्यानंतर बकिंगहॅम पॅलेस येथे जाऊन राणी एलिझाबेथ यांच्याकडे राजीनामा देतील. त्यानंतर ब्रिटनच्या राणी नवीन पंतप्रधानांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतील.