ब्राझीलीया : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. ब्राझीलमध्ये तर कोरोनामुळे ५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. पण ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांना परिस्थितीचं गांभीर्य नाही का? असा प्रश्न विचारला जातोय. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसचे ७१,८८६ रुग्ण झाले आहेत. मागच्या २४ तासात ब्राझीलमध्ये कोरोनामुळे ४७४ जणांना जीव गमवावा लागला आहे. ब्राझीलचं साओ पाउलो शहर कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझीलवर कोरोनाचं संकट वाढत असलं तरी त्यांचे राष्ट्रपती कडक नियम शिथील करण्याच्या तयारीत आहेत. ११ मेपासून आर्थिक उलाढाली सुरू करण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांनी अनेक राज्यांनी घातलेल्या निर्बंधांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राज्यांच्या राज्यपालांनी लागू केलेल्या क्वारंटाईनसारख्या उपाययोजना आता हटवल्या पाहिजेत, असं बोल्सोनारो यांचं मत आहे.


'क्वारंटाईनसारख्या उपायांचा हा शेवटचा आठवडा असेल, अशी माझी अपेक्षा आहे. क्वारंटाईनमुळे लोकांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत,' असं बोल्सोनारो मागच्या आठवड्यात म्हणाले होते. 


लॉकडाऊनचं समर्थन करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांची राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी आधीच हकालपट्टी केली आहे. कडक उपाययोजना केल्या नाहीत तर कोरोना व्हायरस मे आणि जून महिन्यात उच्चांक गाठेल, अशी भीती आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. दक्षिण अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ब्राझीलमध्ये आहेत.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मंगळवारी ब्राझीलकडे इशारा केला होता. आंतरराष्ट्रीय विमानांनी ब्राझीलला येणाऱ्या प्रवाशांची चौकशी आणि चाचणी करण्याचा विचारात आम्ही आहोत, असं ट्रम्प म्हणाले होते. ब्राझीलमध्ये कोरोनाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आम्ही हे पाऊल उचलत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं.