Date Rape Drug Comment : ब्रिटनचे गृह सचिव जेम्स क्लेवरली अडचणीत आले आहेत. क्लेवरली यांनी 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारी निवासस्थानी म्हणजेच 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनमध्ये केलेल्या एका विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. मी माझ्या पत्नीच्या ड्रिंकमध्ये 'डेट रेप' नावाचा अंमली पदार्थ टाकला आहे, असा विनोद क्लेवरली यांनी केला. मात्र या विनोदावरुन आता त्यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे. होणारी टीका पाहून क्लेवरली यांनी माफीही मागितली आहे. तरीही क्लेवरली यांचा राजीनामाच घ्यावा अशी मागणी केली जात आहे. बीसीसीने दिलेल्या वृत्तानुसार, गृहमंत्रालयाने स्पाइकिंगविरोधात धोरण कठोर करण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांमध्येच गृह सचिवांनी हे विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणतीही पूर्व कल्पना न देता किंवा त्याचा विश्वासात न घेता त्याच्या ड्रिंक्स अथवा पेयामधून त्याला एखाद्या पदार्थाचं सेवन करायला लावण्याच्या पद्धतीला स्पाइकिंग म्हणतात.


हे विधान भयानक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'संडे मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार गृह सचिव जेम्स क्लेवरली यांनी कायम काही प्रमाणात गुंगीत असलेली व्यक्तीच एक आदर्श जीवनसाथी असतो. अशा लोकांना बाहेरील जगात त्याच्यांपेक्षा अधिक सुंदर कोणी महिला अथवा पुरुष आहे याचं भान नसतं, असं विधान केलं. यावेळेस त्यांनी रोहिप्नोल नावाच्या अंमली पदार्थाचा म्हणजेच 'रेप ड्रग'चा उल्लेखही केला. लेबर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी क्लेवरली यांचं हे विधान 'भयानक' असल्याचं म्हटलं.


पत्नीबद्दल बोलताना नेमकं काय म्हणाले गृह सचिव?


क्लेवरली हे विवाहबंधनात अडकल्यानंतर दिर्घकाळ नातं कसं टिकून आहे याबद्दल कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळेस त्यांनी, "रोजी रात्री मी तिच्या (पत्नीच्या) ड्रिंक्समध्ये थोडं रोहिप्नोल टाकतो. रोहिप्नोलचा वापर बेकायदेशीर नाही. त्यामुळे ती कायम थोडीशी गुंगीत असते. त्यामुळे तिला असं वाटत नाही की बाहेरच्या जगात माझ्यापेक्षा अधिक हुशार पुरुष आहे," असं विधान केलं. कार्यक्रमामध्ये पंतप्रधान ऋषि सुनक यांच्यासहीत देशातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. अशा कार्यक्रमांमधील सर्व चर्चा या 'ऑफ रेकॉर्ड' असतात. अशा ठिकाणी प्रसारमाध्यमं नसतात. मात्र क्लेवरली यांनी केलेलं हे विधान कोणीतरी व्हायरल केलं आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली.


प्रवक्त्यांनी काय म्हटलं...


"खासगी गप्पा म्हणून ज्या गोष्टींना ग्राह्य धरण्यात आलं त्या व्हायरल केल्या गेल्या. गृह सचिव जेम्स क्लेवरली हे केवळ स्पाइकिंगसंदर्भात बोलताना मस्करी करत होते. यासाठी ते कोणत्याही अटी-शर्थीशिवाय माफी मागत आहेत," असं क्लेवरली यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. 


नुसती मस्करी म्हणून चालणार नाही...


घरगुती हिंसाचार आणि सुरक्षेसंदर्भातील मंत्रालयाचे उपमंत्री अॅलेक्स डेव्हिस-जोन्स यांनी, "ही केवळ एक मस्करी होती, असं कारण देणं आता फार जुनं झालं आहे. हे कोणीही ग्राह्य धरत नाही. जर गृह सचिव खरच स्पाइकिंग आणि हिंसाचाराला तोंड देण्याबाबत गंभीर असल्यास ब्रिटनच्या महिला आणि मुलींना संपूर्ण संस्कृतिक परिवर्तनाची आवश्यकता जाणवतेय. असे असंवेदनशील विनोद थांबवले पाहिजेत," असंही म्हटलं आहे.