चिमुरड्याचं रडणं थांबेना... `ब्रिटिश एअरवेज`नं भारतीय कुटुंबाला विमानाखाली उतरवलं
वाहतूक मंत्रालयात कार्यरत असलेल्या सीनिअर अधिकारी ए पी पाठक यांनी हा आरोप केलाय
नवी दिल्ली : ब्रिटीश एअरवेजच्या कर्मचाऱ्याने भारतीय प्रवाशाला अपमानास्पद वागणूक दिलीय. रडणाऱ्या तीन वर्षाच्या लहानग्याला वर्णद्वेषी शेरेबाजी करत विमानातून फेकून देण्याची धमकी दिली. इतकंच नाही तर तीन वर्षांचं लहान मूल रडायचं थांबलं नाही म्हणून या कुटुंबाला विमानातून खाली उतरवण्यात आलं.
हा संपूर्ण प्रकार रस्ते वाहतूक मंत्रालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यासोबत झाला. या आरोपानंतर ब्रिटीश एअरवेजनं ही घटना गंभीर असल्याचं सांगत भेदभाव खपवून घेतला जाणार नाही, असं सांगितलंय. या प्रकरणी प्रवासी भारतीयासोबत संपर्क केला असून चौकशी सुरू केलीय. ही घटना २३ जुलैला घडली असून हे कुटुंब लंडन बर्लिन विमानात होतं.
वाहतूक मंत्रालयात कार्यरत असलेल्या सीनिअर अधिकारी ए पी पाठक यांनी हा आरोप केलाय. २३ जुलै रोजी ते कुटुंबासहीत ब्रिटिश एअरवेजच्या बीए ८४९५ या विमानानं बर्लिनहून लंडनला जात होते... यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा तीन वर्षांचा लहान चिमुरडाही होता. आपल्यासोबत असलेल्या इतर काही भारतीयांनाही विमानातून खाली उतरवण्यात आलं, असंही पाठक यांनी म्हटलंय.
पाठक १९८४ चे भारतीय इंजिनिअरिंग सेवा अधिकारी आहेत. त्यांनी या प्रकरणाची तक्रार उड्डान मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही केलीय. यानंतर प्रभू यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.