बलात्कार पीडितांच्या कपड्यांचे अनोखे प्रदर्शन
बलात्कार पीडितांना नवा आत्मविश्वास देणे आणि अत्याचारासारख्या वाईट प्रवृत्तींबद्दल समाजात घृणा निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
ब्रुसेल्स: बलात्कार पीडितांचे दु:ख आणि त्यातील भयानकता समाजाच्या ध्यानात यावी यासाठी अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यासाठी एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यात बलात्कार पीडित महिला, मुलींचे कपडे ठेवण्यात आले आहेत. हे कपडे त्यांनी ज्यावेळी त्यांच्यावर अत्याचार झाला तेव्हा अंगावर घातले होते. बलात्कार पीडितांना नवा आत्मविश्वास देणे आणि अत्याचारासारख्या वाईट प्रवृत्तींबद्दल समाजात घृणा निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
बलात्कार पीडितांचाही प्रदर्शनात सहभाग
या प्रदर्शनात एकूण १८ ड्रेस आहेत. ज्यात एका मुलीच्या ड्रेसचाही समावेश आहे. या प्रदर्शनात 'माई लिटल पोनी' टी शर्ट, ट्रॅकशूट आणि पोलीस युनिफॉर्मचाही समावेश आहे. या प्रदर्शनात काही पीडिताही सहभागी झाल्या आहेत. केंजस येथील एका पीडितेने अत्याचाराची दुर्घटना तिच्यासोबत घडली तेव्हा तिच्या झालेल्या मनस्थितीची अवस्थाही सांगितली.
बलात्कार आणि कपडे यांचा संबंध नसतो
'व्हॉट आर यू विअररिंग' असे या प्रदर्शनाचे नाव आहे. बलात्कार पीडितेला अनेकदा लोक विचारतात की तुझ्यासोबत असा प्रकार घडला तेव्हा तू कपडे काय वापरले होते. अर्थात बलात्कार आणि कपडे यांचा काहीच संबंध नाही. पण, हे लोकांच्या ध्यानात येत नाही. म्हणूनच वास्तव ध्यानात आणून देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजाची विचारसरणी बदलण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन
प्रदर्शनाच्या आयोजकांनी म्हटले आहे की, प्रत्येक वेळी बलात्कार पीडितेलाच दोषी ठरवले जाते. समाजाची ही एकांगी विचारसरणी बदलण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ब्रुसेल्स येथील मोलनबीक येथे आयोजित करण्यात आले आहे.